दाटले नैराश्याचे मळभ!

0

दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल आणि निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही दुर्दैवी परंपरा यंदाही कायम आहे. बारावी परीक्षेचा निकाल काल ‘ऑनलाईन’ जाहीर झाला. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या व अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या पुणे, औरंगाबाद व अन्य शहरांतील काही मुलांनी आपले जीवनच संपवले. ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ ठरवत व शारीरिक कमतरतेवर मात करत दिव्यांगांनी मिळवलेले यश साजरे केले जात आहे.

सोलापूरच्या लक्ष्मी शिंदेला जन्मत:च दोन्ही पाय नाहीत. तिने पायाने पेपर सोडवले. ‘मस्क्युलर ऍट्रॉफी’ या दुर्धर आजारावर मात करणारी सलोनी धनंजय, पेपरआधी काही तास वडिलांचे निधन झालेले असतानाही कणखर मनाने पेपरला गेलेली निकिता पांडे यांनी ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती’ हे स्वकर्तृत्वाने सिद्ध केले.

तथापि गुण कमी मिळाले वा अनुत्तीर्ण झाले, अशा कारणांमुळे होणार्‍या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. उलट यंदा पिंपरी-चिंचवडच्या एका पालकाने आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. बारावीच्या परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले या कारणावरून पित्याने राहत्या घरी गळफास घेतला आणि जीवनयात्रा संपवली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खरे तर पालकांनी मुलांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांना धीर दिला पाहिजे. त्याऐवजी पालकानेच आत्महत्या करावी ही आपल्या शिक्षणपद्धतीची असफलता नाही का? संवेदनशील मनांना अस्वस्थ करणार्‍या या घटना आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना विलक्षण ताणाला सामोरे जावे लागते.

वाढती स्पर्धा, पूर्णांक-अपूर्णांकावरून प्रवेश मिळण्याबाबतची अशाश्‍वती, अशा तात्कालिक अडचणींचा दबाव विद्यार्थ्यांच्या मनावर वाढत आहे. त्याचा सामना करणे सर्वांनाच शक्य होत नाही, पण त्या दबावाचा परिणाम संवेदनशील मनाच्या पालकालाही असह्य व्हावा हे परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करणारे उदाहरण आहे. विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परीक्षा आणि निकालाआधी समुपदेशक नेमले जात आहेत.

सुजाण पालकत्वासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे; पण हे प्रयत्न विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्यात पुरेसे सफल का होत नसावेत? नैराश्याचे वाढते सावट दूर करून तरुणांचा आत्मविश्‍वास जागवण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजनेची गरज आहे. अन्यथा ‘नेमेचि येतो…’ या उक्तीप्रमाणे परीक्षा – निकाल – ताणतणाव आणि काहींच्या जीवनाचा अकाली शेवट हे दुर्दैवी चक्र कसे भेदले जाणार?

LEAVE A REPLY

*