दरोड्याच्या प्रयत्नात असणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0

जळगाव |  प्रतिनिधी :  सुरत येथील चोरीमध्ये सराईत असलेली टोळी जळगावात दरोडाच्या उद्देशाने आली होती. या टोळीचा शहर पोलीसांनी पर्दाफाश केला. सहा पैकी चार संशयितांना ताब्यात घेतले असून दोघं फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल निसर्गजवळ दरोड्याच्या उद्देशाने एक टोळके फिरत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. पोनि. प्रदिप ठाकूर यांनी डीवायएसपी सचिन सांगळे यांना याबाबत कळविले.

सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक गंधाले, आशिष रोही, सफौ वासुदेव सोनवणे, विकास महाजन, प्रितम पाटील, नवजित चौधरी, दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, दिपक सोनवणे, अमोल विसपुते यांना हॉटेल निसर्गजवळ पाठविले. या पथकाने मोबाईल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या सुरत येथील टोळीला थांबविले.

सहा जणांच्या टोळीची चौकशी केली. यावेळी समाधान कारक उत्तर न देता सहा पैकी दोघांनी पळ काढला. ताब्यात घेतलेल्या चौघांजवळ मिरची पावडर, दोन बॅटर्‍या, दोरी, चाकू असे दरोडा किंवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने बाळगलेले साहित्य मिळून आले.

चौघं ताब्यात तर दोन फरार

शेख कादीर शेख इब्राहीम (वय २०), वसीम शेख अजीज (वय २१) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना शहर पोलीसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. याचवेळी पोलीसांजवळून दोघं अल्पवयीन फरार होण्यात यशस्वी झाले.

रेल्वे पोलीसांच्या रेकॉर्डवरील संशयीत

सुरत येथील टोळी ही रेल्वेमध्ये मोबाईल व पॉकीट चोरीमध्ये सराईत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलीसांत त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रवाश्यांच्या सतर्कतुन लागला छळा

सुरत भुसावळ पॅसेंजरमध्ये अमळनेरहुन रमेश पौलाद कोळी व लक्ष्मण पौलाद कोळी हे जळगावकडे येत होते.पाळधी सोडल्यावर कोळी बंधू जवळून अज्ञात चोरटयांनी मोबाईल हिसकविले. तर मोबाईल परत करण्याचा आग्रह रमेश कोळी यांनी धरल्याने त्यांना चोरटयांनी बांभोरीजवळ गाडीतून फेकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कोळी बंधूनी रेल्वेमध्ये घडलेला प्रकार शुभम तायडे ह्यांना सांगितला. शिवाजीनगरजवळील दुधफेडरेशनजवळ रेल्वे आल्यानंतर शुभम तायडे, मुन्ना सोनवणे, भगवान सोनवणे, सुनिल शेंगदाणे यांनी संशयीतांना पकडून शहर पोलीस ठाण्याला आणले. यानंतर त्यांच्या अन्य साथीदारांच्या शोधार्थ गेलेल्या पथकाने हॉटेल निसर्ग जवळून इतर संशयितांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

*