दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली

0

श्रीगोंदा, नेवाशातील तरुणांचा समावेश

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मढेवडगाव शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागे दबा धरून दरोड्याच्या तयारीत असलेली बारा जणांची टोळी श्रीगोंदा पोलिसांनी पकडली.

 
याबाबत पोलीस उपनिरीक्षक संजीवकुमार सोने यांच्या फिर्यादीवरून या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या टोळीकडून मिरचीची पूड, लोखंडी कोयते, गज, लाकडी काठ्या, नायलॉनचे दावे दुचाकी गाड्या असा एक लाख तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रानमळा परिसरात दि. 4 रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास सुरु असतांना बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मढेवडगाव शिवारातील एका हॉटेलच्यामागे दि. 5 मे रोजी 5.40 च्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेली ही टोळी पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडे लाल मिरचीची पुड, नायलॉन दोरी, गज, काठी, कोयते असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

 
ताब्यात घेतलेल्यामध्ये गुलाब शंकर काळे (रा. शेडगाव), रोहित संजय पवार (रा. चांडगाव), अजय मिरीलाल काळे (रा. सोनई, ता. नेवासा), माउली बंट्या भोसले (रा. बेटगाव, ता. दौंड), लखन सिकंदर पवार (रा. पेडगाव), महेश फिरास चव्हाण (रा. आढळगाव), संतोष अण्णा काळे (रा. लिंपणगाव), पप्पू मंत्री काळे (रा. काष्टी), अरुण केरू भोसले (रा. मढेवडगाव), संतोष मंत्री काळे (रा. काष्टी), राजेश नामदेव काळे (रा. लोणी व्यंकनाथ), संजय सुरेश काळे (रा. लिंपणगाव), शरद बाटक्या काळे (रा. लोणी व्यंकनाथ), अविनाश बाटक्या काळे (रा. लोणी व्यंकनाथ) यांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवी कलम 399 व 204 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नातेवाईक महिलांचा पोलीस ठाण्यात आक्रोश
पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरूणांना अटक केल्यानंतर यामध्ये ज्यांचा समावेश आहे त्यांच्या महिला नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून आक्रोश केला. पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या आक्रोशाने काही काळ गोनधळ उडाला होता. यावेळी महिला नातेवाईकांनी ताब्यात असलेले घरी असतांना त्यांना पोलिसांनी अटक करून दरोडा टाकण्याचा बनाव करत हकनाक त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल करून अटक केली असल्याचा आरोप केला.

LEAVE A REPLY

*