दंगलीत अटक केलेल्या सराफ तरुणांची सुटका करावी

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-गेल्या आठवडयात झालेल्या दंगलीत पोलीसांनी दंगलीशी काही संबंध नसलेल्या सराफ तरुणांना अटक केली.
त्यांची सुटका करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सुवर्णकार समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
याबाबत वैश्य सुवर्णकार समाजाने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात दि.6 जून रोजी झालेल्या दंगलीत सराफ बाजारातील अनेक दुकानांवर दंगलखोरांनी हल्ले केले.
यामुळे सराफ बाजारात भितीचे व दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवर्णकार कारागीर असलेले निरपराध तरूण आपल्या मोटरसायकलीवरून दुकानावरून आपल्या घरी जात असतांना त्यांना पोलीसांनी भोई गल्ली परिसरातील सुरभी हॉटेलजवळ थांबवून अटक केली आहे.
सदर तरूणांचा दंगलीशी काही संबंध नसतांना अटक केली आहे. अमर सोमेश्वर सोनार व रोशन जयंत सोनार या तरूणांना पोलीसांनी अटक केली आहे.

सराफ सुवर्णकार व्यावसायीक नित्यानंद किरण सराफ यांचे सोनार खुंट जवळील घरावर दंगेखोरांनी अमानुष व निर्दयीपणे हल्ला चढवून घरातील वस्तु लंपास केल्या. तसेच घराला आग लावली.

अनेक सराफ व सुवर्णकारांच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे सराफ सुवर्णकार व्यवसायीकांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सराफ बाजार व टिळक रोड वरील रहिवाशी व व्यावसायीकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे. स्वतःचा जीव व मालाचे संरक्षण व आत्मरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांवरही पोलीसांकडून अकारण गुन्हे दाखल करून अटक केली जाण्याची शक्यता आहे.

अटकेत असलेल्या रोशन सोनार व अमर सोनार या दोन्ही तरूणांची सुटका व्हावी, सराफ बाजार परिसरात वाढीव व कायम पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, नंदुरबार जिल्ह्यातील एसआरपी प्लाटुन कायमस्वरूपी मिळावा, सराफ बाजारातील संवेदनशील भागात सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करून सुस्थितीत ठेवण्यात यावे, नित्यानंद किरण सराफ यांच्या घरातील लंपास झालेल्या वस्तुंचा तपास होवून त्यांना त्या वस्तु परत मिळाव्या व झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांनी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर वैश्य सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*