थेट लाभातून आदिवासी समाजाचा विकास : सावरा ; आदिवासी सेवक, संस्था पुरस्काराने सन्मानित

0

नाशिक : आदिवासी समाजाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबवण्यात येतात. मात्र त्या तळगाळापर्यंत पोहोचत नाहीत. परंतु आता आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी थेट लाभ देण्याचे काम आमच्या सरकारने सुरू केले आहे. त्याद्वारे शाश्वत विकास साधला जाईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व सेवा संस्थांचा महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावरा बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, आ. निर्मला गावित, जिवा पांडू गावित, माजी आमदार शिवराम झोले, आदिवासी विकास विभाग सचिव मनीषा वर्मा, व्यवस्थापकीय संचालक जगदाळे, आयुक्त राजीव जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरा म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी सुमारे सव्वापाच हजार कोटी रुपये शासन खर्च करते. परंतु या पैशांचा योग्य विनियोग होत नसल्याने आज समाज मागे पडला आहे. आदिवासी समाजाचा विकास हेच आमचे आव्हान आहे. त्यादृष्टीने परिस्थिती बदलण्यासाठी आणि समाजाला अधिकाधिक विकसित करण्यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. पेसा आणि वनहक्क जमीन कायद्याच्या माध्यामातून आदिवासी समाजाचे प्रश्न सुटत आहेत. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून त्यांचा विकास साधला जात आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आदिवासी समाजातील मुले-मुली मोठ्या संख्येने आली असून उच्चशिक्षणासाठी त्यांचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार आहे. आदिवासी समाजात कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांच्या सूचना लक्षात घेऊन त्यादृष्टीने आम्ही समाजाचा विकास साधणार आहोत .

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी विभागावर ताशेरे ओढले. या देशाचा खरा मालक असलेला आदिवासी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. त्याची परिस्थिती अतिशय प्रतिकूल बनली आहे. मंत्रालयात आदिवासींच्या विकासासाठी खूप चांगल्या योजना राबवल्या जातात. मात्र भ्रष्टाचारी लोक त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना बाजूला सारून आदिवासींचा विकास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. ग्रामविकास विभागाच्या माध्यामातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आदिवासी समाजासह गरीब व दलित मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने नामांकित इंग्रजी माध्यामाच्या शाळांच्या धर्तीवर आता गावागावांत डिजिटल आणि इ-लर्निंग सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर रंजना भानसी यांनी आदिवासी समाजातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त नृत्य स्पर्धा भरण्यावण्याची मागणी करताना समाजातील महिलांच्या बचतगटांची आयुक्तालयात नोंद करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मनपाच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आदिवासी विकास विभाग सचिव मनीषा वर्मा यांनी प्रास्ताविकात विभागाच्या कार्याचा आढावा घेत महिला, विद्यार्थी आणि समाजाच्या सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी पुरस्कारार्थींनीदेखील आपल्या कार्याचा आढावा घेत समाजाच्या विकासासाठी मनोगतातून सूचना मांडली.

LEAVE A REPLY

*