Type to search

धुळे

थाळनेर येथे जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न

Share

थाळनेर ।वार्ताहर – जिल्हा मध्यवर्ती बँकेची येथील बाजार पेठेतील शाखा आज रात्री भुरट्या चोरांनी फोडून बँकेत प्रवेश केला. परंतु त्यांच्या हाती रोख रक्कम न लागल्यामुळे त्यांनी बँकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकली. याबाबत थाळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.परिसरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण अधिक वाढल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची थाळनेर बाजार पेठेत शाखा आहे. दि.19 रोजी बँकेचे कर्मचारी बँक उघडण्यासाठी बँकेत आल्यावर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी याबाबत थाळनेर पोलिसात अर्ज दिला. परंतु पोलीस न आल्यामुळे त्यांनी आतप्रवेश करून पाहणी केली. तेव्हा बँकेची कागदपत्र अस्ताव्यस्त फेकलेली दिसली. बँकेत चोरीचा प्रयत्न दि.18 रोजी रात्री झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी देखिल थाळनेर गावात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पूरग्रस्त कॉलनी, शिक्षक कॉलनी आदी चार ते पाच ठिकाणी चोरी झाली होती.

तसेच चार दिवसापूर्वी भोई गल्लीतील एक कोंबडी मटणाचे दुकान व दोन दिवसा पूर्वी बस स्थानका जवळील पान टपरी, ग्रामीण रुग्णालय जवळील किराणा व कटलरीचे दुकान फोडण्यात आले. गावात भुरट्या चोरींचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गावात पोलीस स्टेशन असून देखिल पोलिसांच्या हाती चोरटे लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन नागरिकामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने पोलीस ठाणे फक्त शोपीस ठरत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!