थायराईड ग्रंथीचे आजार

0
इन्शुलीन या अंत:स्त्रावी घटकाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जसा मधुमेह होतो, त्याचप्रमाणे थायरॉईड या दुसर्‍या एका अंत:स्त्रावी ग्रंथीचा स्त्राव कमी वा अधिक झाल्यामुळे दोन वेगवेगळे रोग होऊ शकतात. दोन्ही रोगांच्या लक्षणात दोन धु्रवांसारखेच अंतर असते. मधुमेहाइतके नाही. तरी थायरॉइडचे रोगही बर्‍याच प्रमाणात होतात. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा पाचपट अधिक आढळते.

निसर्गाचा ‘बो’
थायरॉइड (यालाच अवटु ग्रंथी असे संस्कृत नाव आहे) ही गळ्यावर ‘बो’ लावायच्या जागी असणारी व ‘बो’ अथवा फुलपाखराच्या आकाराशी साधर्म्य असलेली ग्रंथी आहे. तिच्या स्त्रावांपैकी ‘थायरॉक्झिन’ हा प्रमुख आहे. तो शरीर क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असतो. इंजिनमध्ये पेट्रोल कमी झाल्यावर गाडी जसे गचके खाईल तसाच परिणाम थायरॉक्झिनचे प्रमाण कमी झाल्यास शरीरावर होतो. शरीर वाढीसाठीही या स्त्रावाची आवश्यकता असते. त्या स्त्रावाचे प्रमाण कमी जास्त होणे हे शिरस्थ पिट्युटरी ग्रंथीवर देखील अवलंबून असते.

मिस्टर गॉयटर, चले जाव
गळ्यात मध्यभागी थायरॉइडच्या जागी दिसणार्‍या सुजेला ‘गॉयटर’ असे नाव आहे. यालाच कंठमाळा, गलगंड, गंडमाळा, गिल्हड अशीही नावे आहेत. ही सूज गिळता-खाताना वर खाली हलते. आहारातील आयोडिनच्या कमतरतेमुळे सहसा गॉयटर होतो. मुली वयात येतांना व गर्भारपणातही तेह आढळते. क्वचित ग्रंथीचा दाह झाल्यामुळे वा कर्करोग झाल्यामुळेही गॉयटर होऊ शकते. मातीतच आयोडिनचे प्रमाण कमी असेल. तर तिथे वाढलेल्या भाज्या, फळे, वनस्पती यातही त्याचे प्रमाण कमी होते. तोच आहार घेणार्‍या व्यक्तीत, आयोडिनची कमतरता गॉयटर रुपाने दिसू शकते. भारतात हिमालय, मराठवाड्यात बीड या भागात गॉयटर आढळतो. कोबी, फ्लॉवर या भाज्यांच्या अति वापराने देखील गॉयटर होते.

नमक देते चमक
आयोडिन अगदी अल्प मात्रेमध्येही मिळत राहिल्यास गॉयटर टाळता येते. त्यासाठी खाण्याचे मीठ आयोडिनयुक्त (आयोडायझड सॉल्ट) करण्याचे सरकारी धोरण प्रशंसनीय आहे. पालक व दुधातूनही पुरेसे आयोडिन मिळते. समुद्रातून मिळणार्‍या माशांमध्येही आयोडिन भरपूर असते.

लक्षणांची दोन टोके
थायरॉक्झिन या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास छातीत धडधड होणे, खूप भूक लागूनही जुलाब झाल्यामुळे वजन कमी होणे, हातापायाला कंप, घाम येणे, अस्वस्थता, निद्रानाश, गरम हवामान सहन न होणे, गळ्यावर सूज येणे व डोळे बाहेर आल्यासारखे वाटण्याइतकी सूज येणे अशी लक्षणे दिसतात.

याच्या उलट थायरॉक्झिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजन वाढणे (ही अशी अवस्था आहे की, यात पेशंट खातो कमी तरी त्याचे वजन वाढते) थकवा वाटणे, त्वचा रुक्ष होणे, सर्व अंगाला सूज येणे, आवाज घोगरा होणे अशी लक्षणे दिसतात. पेटक्यात गोळे येणे, एकूणच हालचाली व मानसिक विचारात मांद्य येणे म्हणजे हळूहळू व मंदपणे होणे, हे ही दिसते. अति आहाराने चरबी वाढून जाड झालेल्या माणसात व थायरॉक्झिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होणार्‍या जाडेपणात फरक करण्यासाठी एक लक्षण उपयोगी पडते. दुसर्‍यात थंड हवामान सहन होत नाह तर पहिल्यात थंड वातावरण सहन होते एवढेच नव्हे. तर ते हवेहवेसे वाटते. मातेत थायरॉक्झिन कमी असल्यास बालकात बुद्धिमांद्य होऊ शकते. म्हणजेच मंदपणा येतो.

थायरॉइड थोपवण्याचे थोडे थांबे
थायरॉइडच्या लक्षणांबरोबरच त्या स्त्रावांच्या रक्तातील प्रमाणाची तपासणी, क्वचित त्या ग्रंथींची सोनोग्राफी करून रोगाचे निदान करता येते. उपचारामध्ये गोळ्या, रेडिओ, अ‍ॅक्टिव्ह आयोडिन वा शस्त्रक्रिया करून ग्रंथींचा भाग कापून काढणे असे पर्याय असतात. गोळ्यांचा उपचार केवळ डॉक्टरी सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली घेणे आवश्यक असते. स्त्राव कमी होणे ही कायमस्वरुपी विकृती असल्याने त्या स्त्रावरुपी गोळ्यांचा पुरवठा आयुष्यभर करावा लागतो. सुदैवाने त्या गोळ्या फार महागड्या नाहीत.

डॉ. विकास गोगटे  

LEAVE A REPLY

*