Type to search

अग्रलेख संपादकीय

थापा तरी किती माराव्यात?

Share
जनतेला वर्षानुवर्षे भूलथापा मारत नेतेमंडळी सत्तासुख भोगत आहेत. विद्यमान सत्ताधार्‍यांनी थापेबाजीत कमालीचे प्राविण्य प्रदर्शित केले आहे. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडकलेला वणवा विझण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. तसा सरकारचा इरादाही नसावा.

केंद्र सरकारच्या आघाडीवर कोणतीही हालचाल नसल्याने इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसने देशव्यापी बंद पुकारला. त्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. यापूर्वीचे विविध पक्ष-संघटनांचे बंद कधी-कधी हिंसक आणि हानीकारकसुद्धा ठरले. त्या तुलनेत काँग्रेसचा बंद बराच शांततेत पार पडला. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा संदेश जनता जनार्दनापर्यंत पोहोचवण्यात सर्व विरोधी पक्ष यशस्वी ठरले आहेत.

बंदला एकवीस पक्षांचा पाठिंबा मिळाला. विरोधकांच्या ऐक्याची खिल्ली उडवणार्‍या सत्ताधार्‍यांना त्यामुळेच घाम फुटला असावा. इंधन दरवाढ सरकारच्या हाती नसल्याचे सांगून एका केंद्रीय मंत्र्याने हात झटकले आहेत. बंद निमित्ताने विरोधकांच्या एकजुटीचे दर्शन घडले. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जणू महाआघाडीची रंगीत तालीमच झाली. सरकारने मात्र बंदचा फज्जा उडाल्याची प्रतिक्रिया देऊन पोरकटपणाचे प्रदर्शन केले आहे.

फज्जा उडाला असेल तर सत्ताधार्‍यांच्या तोफा का धडाडल्या? इंधन दरवाढीचा प्रश्न काँग्रेसच्या राजवटीतसुद्धा होता; पण बराच सौम्य होता. तरीही आजचे पंतप्रधान तेव्हा तावातावाने बोलत. सरकारवर कठोर प्रहार करीत. मनमोहन सिंग यांची ‘मौनीमोहन’ अशी संभावना करीत. सध्या इंधन दरवाढीचा आलेख दररोज उंचावत असताना एरव्ही बोलघेवडे पंतप्रधान ‘मौनीबाबा’ बनले आहेत.

आजवर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने केल्या नसतील इतक्या विदेश वार्‍या मोदीजींनी केल्या. त्यामुळे जगातील परिस्थितीची त्यांना जाणीव झाली असेल. आकाशवाणीवर महिन्यातून एकदा ते ‘मन की बात’ करतात. मात्र महागाईने हैराण जनतेला त्या ‘बाता’ आता रुचत नाहीत. त्यांच्या तोंडून ‘जन की बात’ ऐकायला जनता आसुसली आहे. सरकारकडून आतापर्यंत मारल्या गेलेल्या भूलथापांनी जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. चालू संसदेची मुदत संपायला काही महिने बाकी आहेत.

तरी ‘अच्छे दिन’चा मागमूसही कुठे नाही. आतापर्यंतच्या घोषणा या फक्त वार्‍यावरची वरात होती हे न समजण्याइतके ‘भाईयों और बहनों’ व ‘प्यारे देशवासी’ दूधखुळे नाहीत. आणखी थापा मारल्यास जनक्षोभ उसळेल याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधानांनी ‘मौन’ पत्करले असावे. तेवढी समज त्यांना आहे. तथापि सहकार्‍यांवर ती जबाबदारी सोपवल्यामुळे त्यांच्या वाचाळपणाला बहर आला आहे. त्याला प्रभावी प्रतिबंध करणे सरकार आणि भाजपच्या हिताचे ठरेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!