Type to search

ब्लॉग

थंडीतल्या त्रासाची बदलती परिमाणे

Share
सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात सर्दी पहिल्यांदा गाठते. ही सहसा अ‍ॅलर्जीक सर्दी असते. एखाद्याला एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी का असते किंवा अचानकच ती का निर्माण होते याचे समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. अनेकांना कशाकशाची अ‍ॅलर्जी असते. पण धुळीमुळे अ‍ॅलर्जीचा त्रास सहन करणार्‍यांची संख्या जास्त आहे. हिवाळ्यात तर हवेत तरंगणार्‍या धुलिकणांचे प्रमाण अनेक ठिकाणी खूप जास्त असते. या धुलिकणांमध्ये अनेक प्रकारचे घटक आणि जिवजंतू असतात. घरोघरी किंवा रस्त्यांवरच्या स्टॉलवर अन्नपदार्थ तयार करताना होणारा धूर टाळण्याबरोबरच काही ठिकाणी पाणी गरम करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी अद्यापही कोळशाचा किंवा लाकडांचा वापर केला जातो, तिथे होणारा धूरही यात भर घालतो.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटचे प्रमाण हवेत अधिक असणे साहजिक असते. कोळशाच्या वखारींच्या ठिकाणी कार्बनचे कण हवेत मिसळलेले असतात. हवेतली धूळ घरात शिरते आणि सहसा पंखे आणि इतर वस्तूंप्रमाणेच अंथरुण आणि पांघरुणावर ती जमा होते. इतर कोणत्याही गोष्टींच्या संपर्कापेक्षा अंथरुणाशी आणि पांघरुणाशी व्यक्तीचा अधिक प्रमाणात संपर्क येतो. थंडीच्या दिवसांमध्ये तोंडावरून पांघरुण घेऊन झोपणार्‍यांची संख्या अधिक असते. अशा वेळी हे कण मोठ्या प्रमाणात श्वसनातून शरीरात शिरतात.

यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी अंथरुण, पांघरुण, उशांचे अभ्रे स्वच्छ धुवावेत. कृत्रिम धाग्यांच्या पांघरुणांऐवजी सुती गोधड्यांचा वापर केला तर त्यांच्यावरची धूळ फक्त झटकूनही निघून जाऊ शकते; शिवाय त्या अधिक गरम असतात ते वेगळेच! बाहेरून घरात आलेली धूळ झाडण्याऐवजी शक्यतो फरशा पुसण्याचा मार्ग अधिक चांगला ठरतो. त्यामुळे धूळ वर उडून नाकात जाणे टळते. शक्य असेल तर व्हॅक्यूम क्लिनर वापरावा. त्यामुळे घराची सफाई चांगली होतेच; शिवाय घरातल्या व्यक्तींना धुळीचा त्रासही होत नाही. हिवाळ्यात काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी लागते.

पहिली काळजी म्हणजे आईस्क्रीम, थंड रस, उसाचा रस, बर्फ घालून तयार करण्यात आलेली शीतपेये टाळलीच पाहिजेत. मात्र म्हणून पाणी पिणे टाळणे योग्य ठरत नाही. कारण थंडी पडू लागली की हवेतला ओलसरपणा म्हणजेच आर्द्रता कमी होते. त्याचा परिणाम त्वचा आणि घशावर होतो आणि घसा कोरडा पडतो. अशा वेळी पाणी पिणे महत्त्वाचे असते. निरोगी राहण्यासाठी कोणत्याही ऋतूत शरीरातल्या आर्द्रतेेचे प्रमाण पुरेसे असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे श्वसनमार्गात घट्ट कफ तयार होत नाही. या ऋतूत गवती चहाचे प्रमाण वाढते. हा चहा पाण्यात उकळवून प्यायल्यास कफावर परिणामकारक ठरतो. आपल्यला सोसवणारे पातळ पदार्थ या ऋतूत पुरेशा प्रमाणात घेतले पाहिजेत.

प्रत्येक ऋतूत येणार्‍या भाज्या आणि फळे खावीत असा सल्ला नेहमीच दिला जातो. याचे कारण वातावरणातल्या बदलाला नैसर्गिकपणे तोंड देण्यासाठी शरीर सज्ज रहावे अशा भाज्या आणि फळे प्रत्येक ऋतूत तयार होतात. त्यातून मिळणारी जीवनसत्त्वे ऋतूबदलामुळे होणारा त्रास रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. या जीवनसत्त्वांमुळे प्रामुख्याने श्वसनमार्गाची ताकद वाढते. या ऋतूत घरातल्या वायुविजनाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. घरात खेळती हवा असली पाहिजे. त्यामुळे धूळ, सिमेंट, कोळसा किंवा इतर कण हवेत साचून रहात नाहीत. घराला समोरासमोर खिडक्या असतील तर त्या उघड्या ठेवाव्यात. हवेचे बाह्य प्रदूषण घरात शिरू नये म्हणून बरेचजण एअर प्युरिफायरचा वापर करतात. अर्थातच ज्या खोलीत त्याचा वापर करायचा असेल त्याच्या क्षेत्रफळाचा विचार करून निवड करावी. बाहेरची हवा अत्यंत अशुद्ध असेल तर प्युरिफायर वापरूनही थोडाफार त्रास जाणवू शकतो.

स्वयंपाकघरातही शक्य असेल तर एक्झॉस्ट फॅन असावा. थंडी आली की भजी, वडे असे पदार्थ हमखास खाल्ले जातात. शरीराला जाणवणार्‍या थंडीमुळे असे गरमागरम पदार्थ खाणे चांगले वाटत असले तरी शक्यतो असे पदार्थ खाऊ नयेत. अगदीच खायचे असतील तर ते तळताना धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या पचनशक्तीचा विचार करून या पदार्थांचा वापर करावा. त्याऐवजी मोड आलेली कडधान्ये खाणे अधिक महत्त्वाचे ठरते. सहसा कडधान्ये घरी आणून भिजवून त्यांना मोड आणावेत. भिजवून मोड आणलेल्या बाजारातल्या कडधान्यांना जास्त लांब मोड असतील तर तज्ञांच्या मते त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण कमी असते, हे लक्षात घेतले पाहिजे.

फिरायला जाणे हा कोणत्याही ऋतूतला उत्तम व्यायामप्रकार मानला जातो. हिवाळ्यात बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी. व्यायाम केल्याने आलेला घाम पुुसल्यानंतर काही वेळाने पुन्हा थंडीचा त्रास होऊ लागतो. शिवाय व्यायामानंतर लगेच थंड हवेचा सामना करावा लागला तर अनेकांना सर्दी होते. म्हणून व्यायामानंतर पुन्हा स्वेटर, मफलर यांचा वापर करावा. फिरायला जाणार्‍यांनीही कान आणि नाक झाकून घेणारे गरम कपडे वापरावेत. साधे स्ट्रेचिंगचे व्यायाम, योगासने, जिन्यांवरून चढणे-उतरणे हे व्यायाम या काळात उत्तम ठरतात.

त्याबरोबरच प्राणायाम आवर्जून करावेत. कारण त्यामुळे फुफ्फुसात शिरलेले दूषित कण बाहेर पडण्यास मदत होते. दीर्घ श्वसनामुळेही शरीर चांगले राहते. शिवाय हे व्यायाम करण्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही. 15-20 मिनिटांचे प्राणायाम दिवसभरासाठी पुरेसे ठरतात. सूर्यनमस्कारासारखे व्यायाम कमीत कमी वेळात भरपूर फायदे मिळवून देतात. तुमच्या आवडीनुसार वजनांचे झेपणारे व्यायाम, एअरोबिक्सही करू शकता. हिवाळ्यात सकाळच्या वेळी अधिक प्रदूषित हवा असल्यामुळे घरच्या घरी व्यायाम करणे अधिक योग्य ठरते.
– मधुरा कुलकर्णी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!