त्रासदायक सर्दी

0

अनेक कारणांमुळे मुलांना सर्दी होऊ शकते. कोणत्याही एका विषाणूमुळे मुलाला एक दिवस सर्दी झाली, तर दुसर्‍या एखाद्या विषाणूमुळे त्याला महिन्याभरानंतर पुन्हा सर्दी होऊ शकते. हे चक्र सुरू राहू शकते. सरासरी पाच वर्षांपर्यंत मुलाला सहा ते आठ वेळा सर्दी होते. त्यामुळे जन्मापासून सात वर्षांपर्यंत मुलाला 40 ते 50 वेळा सर्दी पडशाच्या वाईट प्रकाराला तोंड द्यावे लागते. मोठ्या वयाच्या मुलाला आणि प्रौढांना वर्षातून एखाद्या वेळी सर्दीचा अधिक त्रास होतो. मुलाला तेवढी प्रतिकारशक्ती प्राप्त होईपर्यंत, सात वर्षांपर्यंत मात्र सर्दीचा मोठाच त्रास सहन करावा लागतो.

थंड, ओलसर, दमट हवा, कोरडी हिवाळी हवा, विशिष्ट प्रकारचे अन्नोत्पादने आणि फळे हे सारेच सर्दीला कारणीभूत ठरणारे घटक आहेत. विषाणूच्या वाढीसाठी काही परिस्थिती अधिक अनुकूल असतात, हे मी मान्य करतो. परंतु सर्दी होण्यासाठी तिथे मुळात विषाणू असणे अत्यावश्यक असते. एका व्यक्तीच्या हाताने दुसरीला संसर्ग होणे आणि आपल्या हाताने विषाणू नाकापर्यंत पोहोचणे या पद्धतीने मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असतो.

विषाणूच्या संसर्गानंतर एक ते दोन दिवसांनी मुलाला किंचित ताप, कणकणी जाणवू लागते. डोके दुखू लागते आणि शिंका येतात. घसा सुजतो. 24 ते 48 तासांत शरीराचे तापमान पूर्वस्थितीला येते. नाकातून स्वच्छ पाण्यासारखा पदार्थ वाहू लागतो. त्यासोबत कोरडा खोकला येतो किंवा येतही नाही. हे पाच ते सात दिवस टिकते.

उपचार
सर्दीच्या उपचारांच्या बाबतीत एक जुनी म्हण आहे. तुम्ही सर्दीसाठी काही उपचार घेतले तर तर सात दिवसात बरी होते आणि काहीच उपचार घेतला नाही. तर ती एका आठवड्यात बरी होते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे सर्दीसाठी कोणत्याही उपचारांची गरज नसते. वरचेवर सर्दी होणार्‍या मुलांना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए, ई यासारखी व्हिटॅमिन्स दिली जातात.

मुलाचे नाक चोंदू न देणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असते. छोट्या बाळांच्या बाबतीत ही गोष्ट अत्यावश्यक असते. कारण नाक चोंदले तर ते साफ करणे आणि श्वासोच्छ्वासकरणे त्यांना शक्य होत नाही. नाक चोंदू नये म्हणून बाजारात नाकात टाकावयाची काही औषधे मिळतात. त्यांचे थेंब नाकात टाकल्यास नाक चोंदत नाही. शिवाय ती सुरक्षितही असतात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ती वरचेवर वापरता येऊ शकतात. हे थेंब तुम्ही घरच्या घरीही बनवू शकतात. त्यासाठी उकळून गार करून घेतलेले एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यात पाव टी स्पून मीठ टाका. एकावेळी एक ते दोन थेंब या प्रमाणात हे थेंब नाकात टाका. यासाठी ड्रॉपरचा वापर करता येतो किंवा कापसाची वात करून तिच्या सहाय्याने नाकात थेंब सोडता येतात.

श्वसनमार्गातून बाहेर पडणारा स्त्राव द्रव स्वरुपातच राखण्याचा एक उपाय म्हणजे वाफ घेणे. उकळत्या पाण्यात चिमूटभर बेंझॉईन टाकणे उपयुक्त ठरते. किटलीतून वाफ देण्यापेक्षा वैद्यकीय दुकानातून मिळणारे थंड वाफेचे व्हेपरायझर अधिक सुरक्षित असतात. व्हेपोरब छातीवर किंवा नाकावर लावू नका. कारण काही मुलांना त्यामुळे पुरळ येते.

अँटिथिस्टॅमाईन्स आणि डेकोसेस्टंट्स असणार्‍या पातळ औषधांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. ती लिहूनही अधिक प्रमाणात दिली जातात, वापरली जातात आणि त्यांचा गैरवापरही अधिक होतो. ही औषधे स्त्राव कोरडा करतात. त्रस्त मूल आणि विव्हळ पालक यांना घटकाभर डुलकी मिळवून देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

सहसा सर्दीसाठी जैवप्रतिरोधकांची गरज नसते. मात्र मुलाच्या नाकातून सातत्याने घट्ट, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव बाहेर पडत असेल आणि तापही असेल तर त्यांची गरज भासते.

खरे म्हणजे सर्वसाधारण सर्दी हा काही गंभीर आजार नाही. मात्र त्याच्यातूनच कित्येक प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यात ओटायटीस मेडिया (कानाचा संसर्ग), सायन्युसायटिस (चेहर्‍याच्या हाडांभोवती असलेल्या पोकळ्यांचा अस्तरदाह), सर्व्हायकल अ‍ॅडेनायटिस (मानेतील ग्रंथींचा आकार वाढणे) आणि ब्राँकायटिस (फुफ्फुसांचा दाह होणे) या गोष्टी होऊ शकतात.

जर मुलांमध्ये खालील लक्षणे आढळली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कानात जोरदार वेदना होणे (ओटायटिस मेडिया) घरघर आवाज न येता जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे (दम्याचा झटका, ब्राँकायटिस किंवा ब्राँकिओलायटिस)
* ताप आणि सातत्याने घट्ट स्त्राव (शेंबूड) नाकातून बाहेर पडणे.
* मुलांच्या वर्तनात मंदपणा येणे, जेवणाची किंवा काही खाण्याची इच्छा नसणे आणि कमी प्रमाणात लघवी होणे.
– डॉ. योगिता पाटील

LEAVE A REPLY

*