‘त्या’ तरुणीवर दबावतंत्राचा वापर; एसपींच्या आदेशानंतरही गुन्हा नाही

0

पोलीस प्रशासनाची सलगी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीसाठी शहरात आलेल्या राहुरीच्या तरुणीवर मंत्र्यांच्या बॉडीगार्डने अत्याचार केल्या प्रकरणाची चौकशी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश एसपी रंजनकुमार शर्मा यांनी दिल्यानंतर अजूनही पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान पिडित तरुणीवर दबावतंत्राचा वापर करून तिला अर्थकारणात प्रवृत्त केले जात असल्याची माहिती दस्तुरखुद्द पिडित तरुणीनेच ‘नगर टाइम्स’ला दिली आहे.
पिडित तरुणीचा गर्भपात झाला असल्याने प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करून बॉडीगार्डकडून प्रकरण दडपण्याचा हा खटाटोप सुरू आहे. आपल्यावर अन्याय झाल्याच्या भूमिकेवर तरुणी आजही ठाम आहे. पोलीस व बॉडीगार्डची मिलीभगत असल्याचा आरोप तिने केला आहे.
नगर शहरातील तपोवनरोड भागात राहणार्‍या एका मातब्बर मंत्र्याच्या बॉडीगार्डने या तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. मात्र काही दिवसात हा तरुण विवाहीत असल्याची माहिती तरुणीस मिळताच तिने थेट तरुणाचे घर गाठले. दरम्यान पिडीत तरुणीस जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण तसेच धमकी देण्यात आली. हा प्रकार सांगण्यासाठी तरुणीने पोलीस ठाणे गाठले. मात्र तिची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे पोलिसांनी तिला रूग्णालयात दाखल केले व उपचारानंतर थेट रुमवर सोडविले. त्याचवेळी पोलिसांनी तिची फिर्याद नोंदविणे अपेक्षीत होते. मात्र मंत्र्याचा बॉडीगार्ड असलेल्या तरुणाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे पोलिसांनी एकमेका सहाय्य करुन अशी भूमिका ठेवत तरुणीस गुन्हा दाखल करण्यापासून प्रवृत्त केले. एका वकीलाच्या मदतीने तिच्यावर दबाव टाकून माझी कोणतीही तक्रार नाही असे लेखी घेण्यात आले असल्याचे समजते. हा प्रकार रिपाईच्या कार्यकर्त्यांना समजला असता त्यांनी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली.
दरम्यान हा सर्व प्रकार होऊन देखील गुन्हा का दाखल होत नाही असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पिडीत मुलीकडे सर्व कागदपत्रे असून तीने ते अधीक्षकांपुढे सादर केले आहेत. हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस दलातील काही कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील तथाकथीत नेते व राजकीय नेते प्रयत्न करीत आहेत. पिडीत मुलीस धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असून माझ्या जिवीतास धोका असल्याची तक्रार तिने पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे. त्यामुळे ही घटना पुढे नेमके काय वळण घेणे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

रिपाईचा आंदोलनाचा इशारा
पिडीत मुलीवर अत्याचार झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. या मुलीकडून बळजबरीने नको त्या गोष्टी लिहुन घेतल्या जात आहे. घटनेत सर्व लोक मातब्बर आहे. त्यामुळे पिडीत मुलीस योग्य तो न्याय मिळावा असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक शर्मा यांना दिले आहे. 10 दिवसात योग्य न्याय मिळाला नाही तर एसपी कार्यालयासमोर रस्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*