‘त्या’ गरीब महिलांचे पैसे मिळाले परत !

0
मोदलपाडा ता.तळोदा / पालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता उघडपणे पैसे घेऊन ऑनलाईन घरकुलाचे अर्ज भरणार्‍या दोघांना शिवसेनेच्या आक्रमक पवित्रामुळे अखेर पैसे परत करावे लागले.
तळोदा शहरातील खान्देशी गल्लीच्या प्रवेश भागातच एका खोलीत दोन तरुणांनी पंतप्रधान आवास योजनेचे फलक लावून नोंदणी सुरू केली होती.
ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे जितेंद्र दुबे व आनंद सोनार यांनी उन्हात रांगेत बसून घरकुल मिळेल या आशेने बसलेल्या महिलांशी संवाद साधला.
सर ठिकाणी गरीब महिलांची आर्थिक पिळवणूक होत आहे हे लक्षात आणून देण्यासाठी सेनेचे पदाधिकारी व महिलांनी मुख्याधिकारी यांचे दालन गाठले व सदर बाब मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
याची गंभीर दखल घेत जनार्दन पवार यांनी दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. दरम्यान सदर तरुणांकडे कोणतेही आदेश अथवा परवानगी नसल्याचे आढळून आले होते.

जिल्ह्यात नुकतेच प्रशासनाच्या आदेशानुसार नंदुरबार, शहादा नवापूर येथे सदर घरकुल योजनेबाबत अर्ज वाटणी सुरू आहे.

मात्र, या व्यतिरिक्त इतर भागात लक्षांक दिला असल्याने जिल्हातील उर्वरित तळोदा पालिका अक्कलकुवा नगरपंचायत धडगांव नगरपंचायत या भागात देखील या योजनेबाबत जनजागृती करून माहिती देणे अपेक्षित होते.

मात्र तळोदा शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून रीतसर पैसे काही लोक उकळत असल्याची तक्रार जितेंद्र दुबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

याबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी या प्रकाराबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत असा प्रकार होत असल्याचे लक्षात आल्यास गुन्हे दाखल करू असे सांगितले होते व त्यानुसार आता या दोन्ही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यात काही महिलांनी तर आपले दागिने व बांगडया विकून पैसे आणले होते व फॉर्म भरत होते.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मेनरोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रासमोर पंकज ठाकरे व सचिन धनगर या नावाच्या व्यक्ती बाहेर गावाहुन येउन एक लॅपटॉप व लॅमीनेशन मशीन व पंतप्रधान आवास योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून देत होते.

काल दुपारी शिवसेनेचे जितेंद्र दुबे, आनंद सोनार, व प्रदीप शेंडे आदींसह कार्यकर्त्यांनी त्या योजनेसंबंधी माहिती विचारली की, न.पा.ने परवानगी दिली आहे का, दिली असेल तर दाखवा असे सांगितले.

त्यांना मुख्याधिकारी पवार यांच्या यांच्यासमोर उभे करण्यात आले व जमलेल्या सर्व लोकांसमोर श्री.पवार यांनी सांगीतले की, पालिकेतर्फे कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरला आवेदने भरण्यासाठी परवानगी दिलेली नाही.

त्यासाठी टेंडरिंग प्रक्रिया सुरु आहे. संस्था नेमणुकीनंतर प्रत्यक्ष सर्व्हे पडताळणी करून पालिकेमार्फत ऑनलाइन फॉर्म भरले जातील व जनजागृतीसाठी शहरात रिक्षाने दवंडी दिली जात आहे.

या प्रकारानंतर पालिकेच्या आवारातच ठाकरे व धनगर यानी आज फॉर्म भरलेल्या सुमारे 100 महिला-पुरुषांकडून घेतलेले फीचे 150 रूपये परत केले.

याआधी शहरात दोन खाजगी कॉम्प्युटर सेंटरवरही सुमारे हजाराचा वर फॉर्म 100 ते 500 रुपये घेवुन भरले गेले आहेत व खाजगी सेंटर वाले पसार झाले आहेत.

त्यामुळे लोकांची फसवणूकही होतच आहे. परंतु यानंतर शिवसेनेने तात्काळ गोर गरीब महीलांचे पैसे परत करा असा आग्रह धरुन संबंधिताला पैसे देण्याचे सांगितले.

मात्र सदर व्यक्तीजवळ पुरेसे पैसे नसल्याने त्यानी ठराविक महिलांनाच पैसे देवून उर्वरित पैसे नंतर आणून देतो असे सांगितले.

संबंधित व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करित असल्याचे पाहून उपस्थित महिला आक्रमक होउन संबंधीतांच्या अंगावर धावून आल्याचा प्रकारदेखील घडला होता.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तात्काळ पोलीसांना पाचारण करून संबंधितांना ताब्यात देण्यात आले. यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*