Type to search

ब्लॉग

… तो मुमकिन है|

Share

बहुमत नसताना अल्पमताचे भाजप सरकार स्थापन करण्याचे धाडस करून आणि नंतर ते स्थिर ठेवून पाच वर्षे राज्यकारभार करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत. ‘देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ ही उक्ती फडणवीस यांनी सार्थ ठरवली आहे. विरोधकांनाही ते पुरून उरले आहेत. आक्रमक विरोधकांचा त्यांनी चतुराईने मुकाबला केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला घवघवीत यश मिळवून दिले. त्या जोरावर ‘पुन्हा येण्याचा विश्‍वासही बोलून दाखवला आहे.

पंधराव्या विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकींची घोषणा कोणत्याही क्षणी होईल. मावळत्या विधानसभेत राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे भाजपचे पहिले-वहिले सरकार टिकवले व कार्यकाळ पूर्ण केला आहे. मावळत्या सरकारच्या कामगिरीबाबत आता सिंहावलोकन करायचे ठरल्यास ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा या काळात शब्दश: खरी करून दाखवण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. देशात ‘मोदी है तो मुमकिन है’ असा नारा दिला जात आहे. तसाच राज्यात आता ‘फडणवीस है तो मुमकिन है’ याचेच प्रत्यंतर आले आहे.

फडणवीस सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेना सोबत नव्हती. केवळ १२२ सदस्यांच्या बळावर विश्‍वासदर्शक ठराव मंजूर करून घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी या सरकारला आपण सहज ‘खिशात घेऊन फिरू शकतो’ असे समजून काही राजकीय डाव टाकले. मात्र त्यावर कडी करून पहिल्यांदा फडणवीस यांनी महिना-दीड महिन्यातच विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देऊन सत्तेसोबत घेतले. त्यानंतर शेवटच्या वर्षात त्यांनी दुसरे विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांना आपल्या मागे येण्यास भाग पाडले. यातून त्यांच्या राजकीय चातुर्याचा आणि चाणक्य नीतीचा दाखला मिळतो. ज्या विधानसभेच्या कार्यकाळात एक नव्हे तर दोन विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षात गेले, असा नवा इतिहास झाला त्या विधानसभेचे नेते होते देवेंद्र फडणवीस! राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भ्रमनिरास त्यामुळेच झाला आहे.

त्यानंतर दुष्काळाचा प्रश्‍न आणि प्रशासनाचे सहकार्य अशा मुद्यांवर या सरकारला असहकार करण्याचा प्रयत्न झाला. तरीही जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशन अशा उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची चळवळ उभी करण्याचे काम सरकारने केले. ज्याची केवळ पूर्वी चर्चा होत असे. मात्र राज्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या उणिवा खणून काढण्याचे काम या सरकारने सुरू केल्यानंतर विरोधकांवर बाजी पलटवण्यात आली. सहकार क्षेत्रात मक्तेदारी म्हणून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मनमानीला चाप लावताना कायदेशीर बदल करण्यात आले. त्यामुळे मग महाराष्ट्रभूषण पुरस्कार शिवशाहिरांना देणे, भीमा-कोरगावात भिडे गुरूजींच्या मुद्यावरून, शेतकरी आणि शेतीच्या प्रश्‍नांवरून संघ आणि उच्चवर्णीय समाजातून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे कामही विरोधकांनी करून पाहिले. त्यानंतर धनगर आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरही या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार्‍यांना फडणवीस यांनी संयमाने वागून जेरीस आणले.

आता तर त्यांंच्या पक्षातील दिग्गजांना भाजपत किंवा शिवसेनेत सामावून घेण्याचा सपाटा लावून विरोधकांना एकटे पाडण्यात ते यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे. हे सारे होत असताना आर्थिक आघाडीवरदेखील या सरकारला अडचणींचा सामना करावा लागला हे पाच वर्षांत दिसून आले आहे. देशात लागू झालेल्या नोटबंदी आणि वस्तू आणि सेवाकर कायद्यामुळे आर्थिक क्षेत्रात उलाथापालथ झाली. सोबत सातवा वेतन आयोग, शेतकरी कर्जमाफीसारख्या मोठ्या मुद्यांवर विकासासाठी हवा असलेला निधी सरकारला वापरता आला नाही. त्यामुळे चीन आणि जपानच्या कंपन्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडील कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन विकासकामे करीत असल्याचा देखावा सरकारला करावा लागला. २०१९ मध्ये मतदानाला जाताना ‘मेट्रो’ने जाण्याचे स्वप्न दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न असो किंवा बिहारच्या निवडणुकीपूर्वी इंदू मिलच्या मुद्यावर स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा विषय असो अथवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्याचा मुद्दा असो, हे मुद्दे वर्षानुवर्षे चर्चेत होते. त्यावर सरकारने जोरदारपणे काम सुरू केल्याचे दिसले. मात्र २०१९ च्या निवडणुकीसाठी एकही प्रश्‍न मार्गी न लागताही हे मुद्दे संपल्यासारखी स्थिती आणून फडणवीस यांनी विरोधकांना नामोहरम करणे म्हणजे काय असते ते ‘याचि देही याचि डोळा’ दाखवून दिले आहे.

राज्यातील महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या मुद्यावर विरोधात असताना सातत्याने आवाज उठवणार्‍या भाजप नेत्यांनी सत्तेवर येताच या मुद्यांवर काय काम केले ते गुलदस्त्यात राहिले आहे. असे असले तरी विरोधकांकडून या मुद्यावर सरकारला उद्या निवडणुका आल्या तरी एकही अडचणीचा प्रश्‍न किंवा चकार शब्द का विचारला जात नाही? यातच या सरकारचे यश दिसून आले आहे. भ्रष्ट मंत्र्यांना ‘क्लीन चिट’ देता-देता विरोधी पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनाच आपल्या पक्षात घेऊन ‘पावन’ करून घेण्याचा सपाटा या सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कुणी या पक्षाला ‘कमळ वॉशिंग पावडर’देखील म्हटले असेल; पण खरेच राजकीय चातुर्याने बहुमत नव्हे अल्पमत असतानादेखील हे ज्यांनी करून दाखवले त्या मुख्यमंत्र्यांना राज्यात भाजपचा ‘कृष्ण’ समजले जाते.

सध्या भाजपत बाहेरून आलेल्या नेत्यांची मांदियाळी तयार झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर अशा संघ भाजप परिवाराशी काही वैचारिकतेचा कोणताही संबंध नसलेल्यांचा राबता दिसतो. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या निकट वर्तुळातच त्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसतो. विलासराव देशमुख यांच्या मागे-पुढे कृपा आणि उल्हास दिसत किंवा पृथ्वीराज बाबांच्या मागे-पुढे बंटी और बबली दिसत असत तसेच हे आहे. हा सत्तेचा महिमा आहे, असे याचे उत्तर द्यावे लागेल नाही का? या सर्वांचा आधार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या विश्‍वासावर हे नेते भाजपत आले आहेत, असे नुकतेच भाजपवासी झालेल्या एका माजी मंत्र्याने सांगितले.

‘सार्‍यांना पुरून उरणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा निर्माण करून एखाद्या अग्निदिव्यातून उजळून निघणार्‍या सोन्याच्या दागिन्याप्रमाणे फडणवीस पाच वर्षांत तावून सुलाखून निघाले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मग ‘डाग’ लावण्याचा ‘व्यक्तिगत प्रयत्न’ करताना त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबतही रान उठवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न ‘जिजाऊ, छत्रपती आणि फुले-शाहूंचा वारसा’ सांगणार्‍या राज्यात झाला. मात्र त्यालाही ज्या खिलाडूपणाने आणि सहजपणे फडणवीस सामोरे गेले त्याला तोड नाही. त्यामुळे फडणवीस यांच्यासाठी ‘झाले बहु, होतील बहू; पण या सम हा’ ही उक्ती योग्य ठरली आहे. भविष्यात फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ हा विश्‍वास आहेच. त्यांनी तो वारंवार व्यक्त केला आहे; पण सध्या भाजपत श्रेष्ठींचा आदेश शिरोधार्य मानून काम केले जाते. त्यामुळे फडणवीस यांना असलेला त्यांच्या उज्ज्वल राजकीय कारकीर्दीचा विश्‍वास सार्थ ठरावा हीच अपेक्षा!
किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!