तोलारखिंड रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागणार ः ना. पाटील

0

अकोले (प्रतिनिधी) – आदिवासी जनतेला मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाचा व जवळचा असणार्‍या तोलारखिंड या रस्त्याचा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिले.

 

 

मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत ना. पाटील बोलत होते. यावेळी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, रस्ते सचिव सी. पी. जोशी, उपसचिव इंगोले, नगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, संगमनेरचे कार्यकारी अभियंता एस. डी. पवार, उपविभागीय अभियंता बी. एन. काकडे, उपविभागीय अभियंता बी. एस. पवार आदी उपस्थित होते.

 

 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राम शिंदे हे शिवार संवाद सभेच्या निमित्ताने मवेशी येथे मुक्कामी आले होते. त्यावेळी या परिसरातील आदिवासी जनतेने तोलारखिंड फोडून मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग व्हावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.

 

 

या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या रस्त्याची निकड कशी असून जनतेला तसेच आदिवासी समाजाला दळणवळणाच्यादृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीने कसे राजकारण करून जनतेला झुलवत ठेवले याचा पाढा भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी मांडला. अकोले तालुक्यातील यापूर्वीचे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून ते अत्यंत खराब झाले आहेत.

 

 

 

हे रस्ते तातडीने दुरुस्त व्हावेत अशी मागणीही त्यांनी केली. यावर अकोले तालुक्याचे सर्व रस्ते तातडीने मार्गी लावून त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोल्हार घोटी राज्यमार्गाचे 141 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू असून विरगाव ते गणोरे रस्ता, अकोले धामणगाव, चिंचखांड रस्ता, बारी ते रंधा रस्ता, अकोले ते देवठाण रस्ता यासह अनेक रस्ते मार्गी लावणार असल्याचेही ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*