तोतया आयपीएस अधिकार्‍याला अटक

0

नाशिकरोड | दि. १० प्रतिनिधी- एका तोतया आयपीएस पोलीस अधिकार्‍याला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून सोशल मीडियात आयपीएस असल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

या संदर्भात नाशिकरोड पोलीसांत गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले कय्युम सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दिली असून सय्यद हे आपले सहकारी वाकचौरे, साळवे, पठाण पळसे गावात गस्तीवर असताना विठ्ठल मंदिराजवळ हिंदवी बंगला येथे अभिजित विजय पानसरे हा अंगावर पोलीसांची वर्दी परिधान करून आयपीएस अधिकारी असल्याचे नातेवाईकांना सांगत असे.

ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्यांनी पानसरे याच्या नातेवाईकांना विचारपूस करून माहिती घेतली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पानसरे याने वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटो काढून अल्बम तयार केला असल्याचे आढळले.

त्यानंतर पोलिसांनी पानसरे यास त्याच्या नाशिक येथील गोविंदनगर भागात असलेल्या घरातून ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पोलीसांची खाकी वर्दी जप्त केली. या प्रकरणी पानसरे याच्यावर भादंवि १७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

फसवणूक असल्यास पुढे या
स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणविणार्‍या तोतया विजय पानसरे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अधिकार्‍याच्या पोशाखातील फोटो व्हॉटसऍप, फेसबुक तसेच इतर सोशल नेटवर्कवर टाकले आहेत. तसेच तो दिल्ली येथे आयपीएस अधिकारी असल्याचे मित्र तसेच काही नागरिकांना सांगत आहे. मात्र त्याने कोणाची आर्थिक अथवा इतर फसवणूक केल्याचे समोर आले नाही. आपण अधिकारी असल्याचे भासवून त्याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी.
– दत्ता कराळे, उपआयुक्त, गुन्हे

LEAVE A REPLY

*