Type to search

आरोग्यदूत

तोंडाचा कॅन्सर

Share

कॅन्सरचे निदान झाल्यावरही जिद्दीने आणि धीराने आवश्यक त्या उपचार पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तोंडाचा कॅन्सर वेगाने पसरणारा असल्याने त्याच्या उपचारांचे दुष्परिणामही असतात. मात्र, हा अपाय उपचार सुरू असेपर्यंत जाणवतात आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे रुग्णाचे मनोधैर्य बळकट असल्यास लवकर कमीही होतात.

अर्थात त्याची कल्पना आणि माहिती रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना असणे गरजेचे असते. उपचार पूर्ण झाल्यावरही आपण कॅन्सरमधून पूर्ण मुक्त झालो असा गैरसमज रुग्ण करून घेतात. सिगारेट, गुटखा य व्यसनाचे दुष्परिणाम तोंडासोबत घसा, अन्ननलिका व स्वरनलिकेतही झालेले असतात. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. नियमित तपासणीने तो टाळता येतो. उपचारानंतर तज्ज्ञांनी सांगितलेला दिनक्रम पाळल्यास, आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात रुग्णाची सकारात्मक इच्छाशक्ती वाढविली आणि योग्य ती काळजी घेतली, तर हा कॅन्सर रोखता येतो. तोंडाशी निगडीत अन्यही काही कॅन्सर आहेत.

कंठस्थ ग्रंथींचा कॅन्सर –
या भागातील आणखी एक कॅन्सर म्हणजे कंठस्थ ग्रंथींचा कॅन्सर, दहा वर्षाची वृषाली कळवण तालुक्यात राहत होती. स्वभावाने काहीशी खोडकर वृषाली शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. काही महिन्यांपूर्वी तिच्या आईला वृषालीच्या गळ्याला एक छोटीशी गाठ जाणवली. गाठ लहान असल्याने आणि दुखत नसल्याने त्याकडे दुर्लक्षच झाले. काही दिवसात त्या गाठीच्या भोवती आणखी काही गाठी झाल्या. गावातील डॉक्टरांनी वृषालीला तपासले. त्यांना वाटले टी.बी.ची गाठ असेल. त्यांनी एक गाठ काढून तपासणीसाठी पाठविली. त्याचा रिपोर्ट आला तेव्हा वृषालीच्या पालकांसोबत तिच्या डॉक्टरांनाही विश्वास ठेवणे अवघड गेले. वृषालीच्या लसिका ग्रंथींना कॅन्सरची लागण झाली होती.

आपल्या शरीरातील विविध कार्य एकसंघ ठेवण्याचे महत्त्वाचे काम संप्रेरके करीत असतात. शरीरातील विविध ग्रंथींमधून ही संप्रेरके तयार होतात. गळ्यासमोरील बाजूस स्वरकोषाच्या खाली असणार्‍या कंठस्थ ग्रंथीमधूनही अशी संप्रेरके तयार होतात. या ग्रंथींना होणार्‍या कॅन्सरचे प्रमाण अवघे 1 टक्का आहे. हा कॅन्सर अतिशय हळू वाढतो. कॅन्सरचे निदान झाल्यावरही हे रुग्ण अनेक वर्ष जगतात. कंठस्थ ग्रंथींच्या कॅन्सरचे काही प्रकार असतात. अनुवंशिकता, वय आणि किरणोत्सार यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये जन्मत: असणार्‍या पेशींमधील दोेषांमुळे हा कॅन्सर होतो. अनुवंशिकतेने होणार्‍या या प्रकारात रुग्णांमध्ये इतर व्याधी असण्याची शक्यता असते. तसेच साधारणपणे 20 ते 40 वयोगटातील स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस छोट्याशा वृषालीसारखे रुग्णही आढळतात. अनेकदा काही उपचारांमुळे किंवा अणुयुद्धामुळे अतिकिरणोत्साराला सामोरे जावे लागलेल्या व्यक्तींना कंठस्थ ग्रंथीचा कॅन्सर होऊ शकतो.

गळ्यातील समोरच्या भागात खालच्या बाजूला आढळणारी गाठ अनेकदा कंठस्थ ग्रंथींची असते. ही गाठ दुखत नाही. गिळतांना खालीवर होते आणि हळूहळू वाढत जाते. बहुतांश वेळा रुग्ण गाठीपासून निर्माण झालेल्या विद्रुपतेसाठी डॉक्टरांकडे येतात. मानेच्या एका किंवा दोन्ही बाजूच्या लसिका ग्रंथींपर्यंत ही गाठ पसरू शकते. अनेकदा भूक न लागणे, अशक्तपणा येणे, खोकला येणे, गिळायला त्रास होणे या सारखी लक्षणे दिसतात. हाडापर्यंत पोहोचलेल्या कॅन्सरमध्ये पाठदुखीही जाणवते. या कॅन्सरमुळे संप्रेरकांमध्ये काही बदल होत नाही.

अतिसूक्ष्म मायक्रोस्कोपद्वारे बारीक सुईने या गाठीतील पेशी काढून त्याची तपासणी केली जाते. अनेकदा सोनोग्राफीच्या मदतीने कंठस्थ ग्रंथींची आणि गळ्यातील इतर लसिका ग्रंथींची तपासणी केली जाते. या तपासणीत खरंच गाठ आहे का? एक आहे की अधिक आहेत? त्यांचा आकार काय? त्या नेमक्या कुठे आहेत हे निश्चित समजते. ट्यूमर मार्कर या तिसर्‍या निदान पद्धतीत रक्ताच्या तपासणीतून आजाराचे निदान व अवस्था निश्चित केली जाते. उपचारानंतरही ही तपासणी केली जाते. रक्तातील थायरॉईड या संप्रेरकाची पातळी तपासूनही याचे निदान केले जाते. शस्त्रक्रिया आणि भूल देण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची असते. तसेच छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी, गरज वाटल्यास सीटी-स्कॅन, बोन स्कॅन या तपासण्यांमधून कंठस्थ ग्रंथींच्या कॅन्सरचे निदान व अवस्था ठरविता येते.

डॉ. राज नगरकर 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!