Type to search

ब्लॉग

तोंडचे पाणी का पळाले?

Share

दुष्काळामुळे जनतेच्या डोळ्यात पाणी आहे तर सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी एक क्रमांक जाहीर करून त्यावर तक्रार करायला सांगितले आहे.

पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रचारी थाटाच्या गाजावाजानंतर आता ऐन दुष्काळात सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्य सरकारने जलयुक्त शिवार, विहिरींची धडक योजना, पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, मागेल त्याला शेततळे यांसारखे कार्यक्रम राबवल्यानंतरचे हे भीषण वास्तव आहे. राज्यात पिण्याचे पाणी नाही, शेती, उद्योग आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मोठा आहे. येत्या पावसाळ्यात पाऊस वेळेत सुरू झाला आणि तो सर्वदूर चांगल्या प्रमाणात कोसळला नाही तर जनतेचे हाल होणारच आहेत. गेल्या चार वर्षांपासून सिंचनाची शाश्वत कामे केल्याचा दावा करणार्‍या सरकारला ऑगस्ट महिन्यात लागणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे आणि काय सांगायचे हा प्रश्न आतापासून भेडसावू लागला आहे.

विधानसभेत आणि सर्वत्र मागील पाच वर्षांत गेल्या पन्नास वर्षांत झाले नाही एवढे काम सरकारने केल्याची फुशारकी आता कामी येणार नाही. जनतेच्या डोळ्यात पाणी येत असताना सरकारच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे!

सध्या स्थिती अशी आहे की, येत्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकासुद्धा सरकारला 29 मेपूर्वी घेता येणार नाहीत. ज्या पुढील हंगामासाठी महत्त्वाच्या आहेत. शेतकर्‍यांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी नाहीच शिवाय वेळेत पीककर्जसुद्धा मिळतील की नाही अशी स्थिती आहे. कारण राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेच्या कारणामुळे सरकारची नामुष्की झाली आहे. विरोधी पक्षांकडून या स्थितीचा राजकीय फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले असून 10 तारखेनंतर मराठा ठोक मोर्चा दुष्काळाच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारणार आहे. आचारसंहितेचा उगीच बाऊ केला जात आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात त्याची काही अडचण नसते, असे शरद पवार यांनीच सांगून टाकले आहे.

दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे 48 तासांत निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्यासह प्रशासनातील जवळपास 500 जण सहभागी झाले होते.

राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी 8879734045 हा व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जाहीर केला. टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीकविमा यांसारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात. त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर नोंदवल्या जाणार्‍या बाबींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणीपुरवठा करताना 2018 ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी, अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिग्रहीत विहिरींसाठी पूर्वी फिक्स रक्कम दिली जात होती. आता त्या विहिरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी शिथिल करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रस्त्याची कामे करताना तलावांना क्षती पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सर्व दुष्काळग्रस्त गावांतील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत. त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. नरेगाअंतर्गत 28 प्रकारची कामे कन्व्हर्जन करून करता येणार आहेत. राज्यात टँकरवर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेर्‍या झाल्या हे लक्षात येऊ शकेल. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे. यात काही अडचणी असल्यास त्याचे निकष तपासून मदतीचे कामही वेगाने केले जाईल. ज्या गावात पाणीपुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठवण्यात यावेत. ती योजना दुरूस्त करून गावांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल. चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
किशोर आपटे, मो. 9869397255

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!