तुझं-माझं जमेना…!

0

पती-पत्नीत वाढता बेबनाव,  समुपदेशनाने वाचवले 427 संसार

सागर शिंदे @ अहमदनगर

नगर गुन्हेगारीत राज्यात अव्वल आहे. त्यात महिला अत्याचाराचा आलेख नेहमी वर जात आहे. वर्षाकाठी जिल्ह्यातून 2 हजार 847 अर्ज केवळ कौटुंबीक तडजोडीसाठी येेतात. त्यातील 427 संसार समुदेशन केंद्रांच्या माध्यमातून पुन्हा उभे राहिले आहेत. पोलीस महिला कक्षात वर्षभरात 950 अर्ज, महिला आयोगाच्या शाखेत 966, तर स्नेहाधारमध्ये 931 अर्ज दाखल आहेत. त्यातील 427 कुटुंबियांचे समुदेशन करून त्यांचा संसार उभा करण्याचे काम महिला समुपदेशन केंद्रांनी केले आहे. एकंदरीत जिल्ह्यात पती-पत्नीमध्ये ‘तुझं-माझं जमेना’ अशी स्थिती आहे. त्यातून अत्याचार वाढत आहेत.

अत्याचाराच्या बाबतीत नगर जिल्हा नेहमी चर्चेचा विषय ठरत आहे. कोपर्डी, भांबोरा, नगर रेल्वे स्थानक, पाथर्डी, अकोले या ठिकाणी झालेल्या महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडले. यामाध्यमातून काही आंदोलने उभी राहिली.

हिलांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी काही अनेक महिलांनी स्टंटबाजी करीत जिल्ह्यात आपले ठाण मांडले होते. मात्र त्यावर ठोस भूमिकेसाठी कोणी पुढे आले नाही. त्यामुळे हे प्रश्‍न वारंवार ऐरणीवर येत राहतात. खरं तर कायदेशीर महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महिला शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सद्या ती शाखाच पीडित अवस्थेत आहे. 2015 मध्ये तेथे पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची तोफखाना पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जयश्री काळे यांनी पदभार घेतला. मात्र त्यांची वैयक्तीक समस्या असल्यामुळे या शाखेला कोणीही वाली राहीला नाही. दोन महिला कर्मचारी या शाखेचे पूर्वीचे काम पूर्ण करीत आहे. त्यामुळे सद्या ही शाखा रामभरोसे सुरू आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्या तरी त्या निवारण करण्यात पोलीस महिला शाखा असमर्थ असल्याचे दिसत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
महिला आयोगाच्या वतीने चालविले जाणारे कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी आहे. तेथे मात्र नेहमी मोठी गर्दी असते. तेथे हजारो महिलांच्या समस्यांचे निरसण केले जाते. अ‍ॅड. निर्मला चौधरी या वार्षिक अहवाल शासनाला पाठवितात. त्यातून महिलांच्या समस्यांची उकल होताना दिसते. स्नेहाधार येथे शिल्पा केदारी यांच्या समुपदेशन केंद्रात 931 पेक्षा जास्त अर्ज येतात. त्यातील 140 पेक्षा जास्त महिलांचे संसार उभे करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र महिला पोलीस शाखेत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. मात्र तेथे समुपदेशन केले जात नाही. किंवा त्यांना जिल्हा महिला शाखेत पाठविले जात नाही. थेट 498 प्रमाणे गुन्हे दाखल केले जातात. नको ते आरोपी त्यात गोवले जातात. त्यामुळे पोलीस ठाणे कुटुंब उदध्वस्त करण्याचे साधन बनले आहे काय असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात. या गोष्टीकडे पोलीस अधीक्षकांनी हा सर्व प्रकार गांभीर्याने घेत मोडणारे संसार उभे करणे व अत्याचार कमी करण्यासाठी विशेष उपायोजना करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*