तीन पंपचालकांना वैधमापन चा झटका

0

नगरमधील कारवाई : पुरवठा विभाग आक्रमक

अहमदनगर (प्रतिनिधी) – मापात पाप करणार्‍या पंप चालकांविरोधात वैधमापनच्या पथकाने कारवाई मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात नगर शहरातील 3 व सुप्यातील एका पंपाची तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन पेट्रोल-डिझेल पंपांवर माप कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ठिकाणी नवजलवरील वितरण बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
उत्तरप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मापात पाप आढळून आले.त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले. मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान जिल्हा वैध मापनशास्त्र यंत्रणेचे दोन निरीक्षक, पुरवठा विभागाचे दोन निरीक्षक यांच्या पथकाने एकाचवेळी

चार पंपावर स्वतंत्रपणे अचानक धाड टाकून तपासणी केली. यामध्ये शहरातील कोठी येथील श्री. बडवे यांचा एचपी सेल कंपनी, शक्करचौकातील बाळासाहेब पवार यांचा आयओसी, सावेडी भिस्तबाग येथील जोशी यांचा बीपीसी व सुपा येथील दादासाहेब पटारे यांचा आयओसी या कंपनीच्या चार पेट्रोलपंपाची तपासणी करण्यात आली अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचिती यांनी दिली.

चार पैकी केवळ भिस्तबाग येथील पंपावरील माप नियमानुसार असल्याचे आढळून आले. 5 लिटरच्या मापात कोठी व शक्कर चौकातील पंपावर प्रत्येकी 10 एमएल व सुपा येथील प्रत्येकी 2 पंपावरील 20 एमएल कमी माप आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने नोटीस बजाविण्यात आलेली आहे. त्यानंतर या तीनही पंपावरील वितरण बंद करण्याची कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी महाजन यांच्या सूचनेवरून सुरु करण्यात आलेली पेट्रोल पंपाची तपासणी मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे.

 या तीनही पंप चालकांना बजाविलेल्या नोटिशीमध्ये दोन दिवसांत संबंधितांनी पडताळणी शुल्क भरणे अपेक्षित असून त्यानुसार पुन्हा पडताळणी करून घ्यावी, असे म्हटले आहे. तसे केले नाही तर वितरण कायमस्वरूपी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा वैधमापन अधिकारी रमेश दराडे यांनी दिली. 

 

LEAVE A REPLY

*