उंबरेच्या तरुणाची आत्महत्या की हत्या?

0
उंबरे (वार्ताहर)- येथील साईनाथ तुकाराम दुशिंग (वय 37) या तरुणाचा मृतदेह केंदळ शिवारात आढळून आलेला आहे. तरुणाने विषारी औषध सेवन केल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी त्याच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा असल्याने त्याची आत्महत्या की हत्या ? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

दुशिंग यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे. परंतु तोपर्यंत पोलिसांचा तपास सुरु आहे. मयत दुशिंग यांच्या हाता – पायाला मार लागल्याच्या खुणा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे बोलले जात आहे.

दि. 9 रोजी भारत प्रभाकर वैरागर यांनी साईनाथ दुशिंग यांच्या तोंडातून फेस आलेला असून ते बेशुध्द अवस्थेत पडलेले असल्याची माहिती ऋषीकेश साहेबराव दुुशिंग (वय 30) यांना दिली. वैरागर यांच्या माहितीनुसार ऋषीकेश दुशिंग केंदळ शिवारात रस्त्यालगत रामदास अंबादास खिळे यांच्या शेताजवळ गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना साईनाथ दुशिंग बेशुध्द अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलविले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

राहुरी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. सााईनाथ दुशिंग यांची हत्या का व कशासाठी झाली, तसेच त्यांनी आत्महत्या का केली असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 साईनाथ दुशिंग याच्या मृतदेहाच्या शेजारीच गोचिड मारण्याच्या विषारी औषधाचा डबा आढळून आला होता. प्रथमदर्शी त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असले तरी त्याच्या पायावर मार लागल्याच्या खूना आहेत. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

*