तिसगांवकरांचा निधी पळविणार्‍यांवर कारवाई करा !

0
रामकृष्ण पाटील,धुळे । दि.13 – जलयुक्त शिवार अभियानातंर्गतच्या कामात तिसगांव (ता.धुळे) शिवारातील साठवण बंधार्‍यात करावयाचे काम चक्क वडेल शिवारातील हिवर्या बंधार्‍यात करण्याचा प्रताप धुळे लघुसिंचन विभागाने केल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
आमचा हक्काचा निधी पळविणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आज(दि.13) केली. धुळे जिल्हाधिकार्‍यांना तिसगांव ग्रामस्थांनी निवेदन देऊन सदरची मागणी केली. यावेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

तब्बल तीन किलोमीटरवर असलेल्या भलत्याच ठिकाणी काम करुन लघुसिंचन विभागाने तिसगावचे हक्काचे काम पळविले आहे.

काम बदलवितांना ग्रामस्थांना व शासनास विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला गेला आहे. तिसगांव गावाचा जलयुक्तमध्ये समावेश आहे.

या तिसगांव परीसरातील भात नदीवरील टकार्‍या वस्तीवरच्या साठवण बंधार्‍यात काम करण्यासंदर्भात निश्चित झाले. शिवार फेरीत ग्रामस्थांनी हे काम सुचविले तसेच आराखड्यातही हेच काम घेऊन ग्रामसभेत मंजूरी देण्यात आली.

शिवारफेरी व ग्रामसभेत ठरल्याप्रमाणेच काम होणे आवश्यक होते. परंतू ग्रामस्थांच्या भावनांचा अनादर करत प्रत्यक्षात काम मात्र भलत्याच ठिकाणी करण्यात आले.

वडेल गावाचा जलयुक्तत समावेशच नसतांना तिसगावचे हे काम चक्क वडेल शिवारात करण्यात आले. वडेल शिवारातील हिवर्‍याच्या धरणातील बंधार्‍यात हे काम करण्यात आल्याने या अजब प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामे मंजुर करतांना शासनाने प्रत्येक गावासाठी निधीचा एक विशिष्ट आकडा ठरवुन दिला आहे.तिसगावसाठी हा निधी कामी न आल्याने तिसगावचे तेवढे विकासात्मक नुकसान झाले आहे.

तिसगाववासियांचा हक्काचा निधी इतरत्र पळविण्यात व येथील काम भलत्याच ठिकाणी करणार्‍या लघुसिंचन विभागाची चौकशी करुन कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

निवेदनावर दीपक पाटील, विजय हटकर, डोंगर पाटील, छोटु पाटील आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

याबाबत लवकरात लवकर सबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांची चौकशी करुन कारवाही करावी अन्यथा या प्रतापाच्या पार्श्वभूमीवर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात ग्रामस्थांनी शेवटी दिला आहे.

सदर निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे, आ. कुणाल पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शिंदे, जि.प.चे अध्यक्ष शिवाजी दहिते, प्रांताधिकारी डॉ.गणेश मिसाळ आदींना देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*