तारीख पे तारीख

0

चेतन इंगळे,मोदलपाडा / तापी नदीवरील गुजरात राज्याच्या हद्दीत असणार्‍या बहुप्रतिक्षित हातोडा पुलाच्या उदघाटनाच्या संभाव्य तारखेने पुन्हा एकदा हुलकावणी दिली असून निर्धारित वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आ.उदेसिंग पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यासह हातोडा पुलाची पाहणी केली होती.

त्यावेळी एस 3 या स्लॅबचे काम सुरु होते. त्याचे पुर्ण सेंटरिंग झाले होते. त्यावर टाकण्यात येणार्‍या स्लॅबसाठी क्रेन उपलब्ध नसल्याने कामाला विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र पुलाचे पूर्ण काम 15 एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी पुलाच्या पाहणीला आलेल्या आ.पाडवी व पदाधिकार्‍यांना दिले होते.

त्यांच्या आश्वासनानुसार आ.पाडवी यांनी कोणत्याही परिस्थितीत मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे निश्चित झाले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून दिली.

मात्र मे महिन्याचा पहिला आठवडा संपायला आला, तरी हातोडा पुलाचे उदघाटन होण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत.

महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने मुख्यमंत्री नंदुरबारला आले,पण कमीतकमी यानिमित्ताने मुख्यमंत्री पुलाची पाहणी व उद्धाटन करणार याबाबत कोणतीच चर्चादेखील घडून आली नाही.

उद्घाटनच्या या तारखा कोर्टाच्या तारखेप्रमाणे असून तारीख पे तारीखचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे.

लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण होऊन पुलाचे लोकार्पण व्हावे, अशी आशा जिल्हावासीयांना आहे.

LEAVE A REPLY

*