तातडीने वीजपुरवठा सुरळीत करा; नाहीतर तालुक्यात फिरू देणार नाही

0

आ. जगताप यांचा ‘महावितरण’ला इशारा

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – पुरेसे पाणी असताना सुरळीत वीजपुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके हातची गेली तर कुणाचीही गय केली जाणार नाही. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास एकाही अधिकार्‍याला तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशारा आमदार राहुल जगताप यांनी देताच येत्या चार-पाच दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले.

 
श्रीगोंदा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे पाणी असूनही शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. वीजपुरवठ्यातील अडचणीमुळे शेतकर्‍यांनी आमदार राहुल जगताप यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यामध्ये वीजपुरवठा वेळीअवेळी खंडित होतो. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विहिरींना पाणी असूनही वीजपुरवठ्याअभावी पिके जळून चालली आहेत अशा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी आमदार राहुल जगताप यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इधापे, डी. के. बागुल, कौस्तुभ डबीर, दीपक सिंग, श्रेयस परांजपे व इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

 
यानंतर चार-पाच दिवसांत आराखडा तयार करून तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले.

LEAVE A REPLY

*