Type to search

अग्रलेख संपादकीय

तातडीने अनुकरणीय उपक्रम

Share
मुंबई मनपा पश्चिम विभागीय कार्यालयाने सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे कचरावेचकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. विभागातील 30-40 कचरावेचकांना एकत्र करून ‘आसरा वेल्फेअर असोसिएशन’ची स्थापना केली गेली.

सुक्या कचर्‍याच्या वर्गीकरणानुसार या प्रकल्पात गाळे तयार करण्यात आले आहेत. सुमारे साडेचारशे कचरावेचक या केंद्रात कचरा वर्गीकरणाचे काम करतात. कचरा संकलित करण्यासाठी त्यांना वाहने, कचरा वर्गीकरणाचे प्रशिक्षण आणि घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी मार्गही नमूद केले आहेत.

या केंद्रात दररोज वीस टनांपेक्षा जास्त सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. त्यातून कचरावेचकांना खात्रीची कमाई होत आहे. या सर्व कामगारांचा वैद्यकीय विमा उतरवण्यात आला आहे. त्यांच्या मुलांची पालिकेच्या शाळेत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. नीती आयोगानेही या प्रकल्पाची दखल घेतली आहे. घनकचरा समस्येची व्याप्ती प्रचंड आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार 2025 मध्ये महाराष्ट्राच्या शहरी भागातून दररोज किमान 57 हजार टन कचरा निर्माण होईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात कचरा टाकण्याच्या जागा मर्यादित आहेत.

त्यांची क्षमताही संपली आहे. शहरांतील कचरा डेपो हटवण्यासाठी आंदोलने होत आहेत. या समस्येकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. गृहनिर्माण संस्थांनीच कचरा वेगवेगळा करून द्यावा व त्यांनी संस्थेच्या आवारात खतनिर्मितीचा प्रकल्प उभारावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा केला जात आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन असे प्रकल्प उभारले आहेत. तथापि या समस्येची व्याप्ती लक्षात घेता व्यापक स्तरावर तातडीने उपाय योजले जाणे अत्यावश्यक आहे.

घनकचर्‍यातील सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने झाल्यास कचरा व्यवस्थापनाबरोबरच कचरावेचकांना उत्पन्नाचा खात्रीचा स्त्रोत उपलब्ध होतो हे मुंबईतील प्रकल्पाने सप्रमाण सिद्ध केले आहे. या प्रयोगाचे मुंबईबाहेर सर्वच जिल्ह्यांत अनुकरण व्हावे यासाठी शासनानेच पुढाकार घ्यायला हवा. यंत्रणेतील अनेक अधिकारी कल्पकतेने काम करतात. अनेक अभिनव योजना राबवतात. प्रकल्प उभारतात; पण त्या अधिकार्‍यांची बदली झाली की परिस्थिती पुन्हा जैसे थे का होते? प्रकल्प गुंडाळले का जातात? याची कारणमिमांसा शासनाकडून शोधली जाण्याची गरज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!