‘ताठ कणा’ चित्रपटात उमेश साकारणार डॉ. प्रेमानंद रामाणी!

0

‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह अलीकडच्या काळात मराठीत तयार झाला असून आत्मचरित्रांवर आधारित चित्रपटांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘बायोपिक’ चित्रपटांच्या या मांदियाळीत आता जगातील एक प्रमुख स्पाईनल सर्जरी तज्ज्ञ असलेल्या डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ताठ कणा The power of imagination’ हा चित्रपट येऊ घातला आहे.

प्रज्ञा क्रिएशनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पहिली झलक माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नुकतीच सादर करण्यात आली.

विजय मुडशिंगीकर, नीलम मुडशिंगीकर, करुणा पंडित या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शन दासबाबू करणार आहेत. कथा-पटकथा-संवाद श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. संगीत राजेश धाब्रे यांच असून छायांकन विली करणार आहेत.डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारण्याचे आव्हान अभिनेता उमेश कामत स्वीकारणार आहे.

‘माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका असून मला ही भूमिका करायला मिळते ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, याप्रसंगी बोलताना उमेशने सांगितले. तसेच ‘माझी भूमिका आणि माझा जीवनप्रवास उमेश खूप चांगल्या रीतीने साकारेल असा विश्वास व्यक्त करताना डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी उमेशला व चित्रपटाच्या टीमला आशीर्वाद दिले’.पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करण्यात अतिशय निष्णात अशा जगातील पहिल्या पाच तज्ज्ञांमध्ये डॉ. प्रेमानंद रामाणी यांचे नाव घेतले जाते.

आपले ज्ञान मुक्तपणे वाटून, समाजासाठी वाहून घेणाऱ्या, वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीही रोज त्याच एकाग्रतेने आणि उत्साहाने शस्त्रक्रिया करणाऱ्या चिरतरूण डॉक्टरची कहाणी म्हणजेच… ‘ताठ कणा’-The power of imagination.सिनेमात पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*