Type to search

नंदुरबार

तळोदा तालुक्यात दोन हजार वनदावे मंजूर, मात्र सातबारा नसल्याने कर्जापासून वंचित

Share

सोमावल, ता.तळोदा | वार्ताहर- तालुक्यातील वनजमिन अतिक्रमणधारकांना अद्यापही सातबारे मिळत नसल्याने त्यांना पिककर्जापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे कृषी कर्जासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना साकडे घालण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांनी सातबाराशिवाय बँक प्रशासन कर्ज देत नसल्याने आम्हास पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा मांडली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मंजूर दावेदारांना अद्याप सातबारे देण्यात आले नाहीत. याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, भारुड यांनी दोन दिवसात अधिकार्‍यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, कोठार, ढेकाटी, वाल्हेरी, अलवान, माळखुर्द, रापापूर, अंबागव्हाण, जांभाई, पाडळपूर, न्यूबन, केलापाणी, सावरपाडा बंधारा, जीवनी, मोकसमाळ, तलाबार, जिरमाळ, कुईरीडांबर, अशा साधारण ३५ ते ४० गावांमध्ये जवळपास दोन हजार वनदावे प्रशासनाने गेल्या ५ वर्षापूर्वी मंजुर केले आहेत. शिवाय हे अतिक्रमणधारक शेतकरी जवळपास ७० ते ७५ वर्षांपासून जमीन कसत आहेत. मात्र त्यांना अजूनही सातबारा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. साहजिकच सातबाराअभावी या शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांपासून उपेक्षित राहवे लागत आहे. सातबार्‍यासाठी त्यांनी तालुका प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली आहे. परंतु त्यांना ठोस कार्यवाही ऐवजी पोकळ आश्वासन दिले जात आहे. शेतकरी सातबारा मागतात तेव्हा याबाबत लवकरच बैठक घेण्याचा बहाणा अधिकारी करतात. जेव्हा शेतकरी त्यांच्यासमोर सातबार्‍याअभावी पीककर्ज मिळत नसल्याची तक्रार करतो, तेव्हा त्यांना ताबा पावती दाखवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र इकडे हे शेतकरी बँक कडे ताबा पावती घेऊन जातात त्यवेळी सातबाराची मागणी केली जाते.

या दोन्ही यंत्रणांच्या  असमन्वयामुळे  शेतकर्‍यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. इकडे ढिम्म प्रशासन सातबारा व मोजणीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याऐवजी वायदे देत असतात. त्यामुळे या वनअतिक्रमणधारक शेतकर्‍यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना साकडे घातले. शेतकर्‍यांनी वनजमिनीचा सातबाराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. बँक प्रशासन सातबाराशिवाय कर्ज देत नाही. त्यामुळे आम्ही सावकारांकडून कर्ज घेऊन शेती कसत असतो. सातबारा व पीक कर्जासाठी सतत दोन्ही यंत्रणांकडे हेलपाटे मारत असतो. तथापी ते प्रतिसाद देत नाहीत. सतत हा ‘चिलम तमाकू’ चा खेळ खेळून अक्षरशः वैतागल्याची भावना त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मांडली. यावेळी जिल्हाधिकारी भारुड यांनी त्यांच्या तक्रारी दोन दिवसात संबंधित बँक व महसूल अधिकार्‍यांची बैठक बोलवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, अतिक्रमणधारक शेतकर्‍यांना या उपरांत तात्काळ पीककर्ज व सातबारे दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र पाडवी, अनिल ठाकरे, सुदाम ठाकरे, बहादूर पाडवी, संदीप पाडवी, राकेश पाडवी, राजकिरण पाडवी, राजू पाडवी, अमर पाडवी, सुनील परदेशी, राहुल पाडवी, गुलाबसिंग वळवी, रतिलाल पावरा, राज्या वळवी, सुकलाल वळवी यांनी दिला आहे.

तळोदा तालुक्यात केलापाणी, चिनीमाती, माळखुर्द, कोयरीडांबर, मोकसमाळ, चिरमाळ, रावलापाणी, कालीबेल, मोठीबारी, धज्यापाणी, गढवली, कालाबार, टाकली, बोरवन, सिसापावली,अंबागव्हाण, अशी साधारण ३० ते ३५ वनगावे आहेत. त्यांना आजही महसुली दर्जाची प्रतीक्षा आहे. ही पाडे वन हद्दीत येत असल्यामुळे दळणवळणाचे रस्ते, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या पाडयाना महसुली दर्जा देण्याबाबत प्रसशानाकडून ५-६ वर्षा पूर्वी प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. सहाजिकच या वनपाडयांना आजही महसुली दर्जाची प्रतीक्षा लागून आहे. वास्तविक प्रत्येक पाड्यात जवळपास ५० पासून तर १५० कुटुंब राहतात, त्यामुळे साधारण चार ते साडेचार हजार लोक तिथे राहतात. मात्र त्यांना स्वतंत्राचा ७२ वर्षा नंतरही मूलभूत सुविधासाठी झगडावे लागत असल्याचे ते सांगतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनजमीन धारकांनाचे प्रलंबीत दावे निकाली काढुन एका महिन्यात सातबारा देण्याचे आश्वासन  पायी लॉंग मार्चच्या वेळी दिले होते. मात्र त्यांचे हे आश्वासन हवेतच विरले कारण शेतकर्‍यांना आजही वनजमिनी बाबत संघर्षं करावा लागत आहे.

७० वर्षा पासून वडीलोपर्जित वनअतिक्रमित जमीन कसत आहे.प्रशासनाने वनदावा मंजूर करून ताबा पावती दिली आहे. मात्र प्रत्यक्षात सातबारा नसल्यामुळे शासनाचा पीककर्ज व इतर योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी यंत्रणाकडे सतत हेलपाटे मारत आहोत मात्र ते प्रतिसाद देत नाही. जिल्हा प्रशासनाने गंभीर लक्ष घालावे.

– राजेंद्र पाडवी,

शेतकरी, लक्कडकोट

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!