Type to search

क्रीडा

…तर धोनीला न्यूझीलंड संघात खेळवू – विल्यमसन

Share

मँचेस्टर । भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर बोलताना विल्यमसन म्हणाला की, धोनी आमच्या संघात खेळण्यासाठी पात्र नाही. तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. पण, धोनीन जर दुसर्‍या देशाचं नागरिकत्व स्वीकारत असेल, तर आम्ही त्याला न्यूझीलंड संघात येण्यासाठी विचारू, असे गौरवोद्गार विलमसनने सामन्यानंतर काढले आहेत. उपांत्या सामन्यात मोक्याच्या क्षणी धोनीचं धावबाद होणं सामन्याचा टर्निंग पाईंट असल्याची प्रतिक्रियाही केन विल्यमसन याने सामन्यानंतर दिली आहे. जाडेजा आणि धोनीने सामन्याचे चित्र बदलले होते.

दोघांनी केलेल्या भागिदारीमुळे भारत विजयाच्या जवळ पोहचला होता. मात्र, जाडेजा आणि त्यानंतर धोनी बाद झाल्यामुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. दोन दिवस रंगलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीचा निकाल आमच्या बाजूने लागला याचा याचा आनंद खूप मोठा आहे. आम्हाला परिस्थितीचा अंदाज अचूक आला. भारताप्रमाणे आम्हालाही असे वाटले होते की लढतीत धावांची बरसात होईल. आम्हाला खात्री होती की भारताचे आघाडीचे तीन फलंदाज बाद केल्यास दडपण निर्माण करता येईल. आघाडीच्या तीन फलंदाजाना बाद केले आणि आम्ही अर्धी लढाई जिंकली. सामन्यापूर्वी केलेल्या प्लॅनिंगनुसार आमच्या गोलंदाजांनी नेटकी गोलंदाजी केली. जाडेजा आणि धोनीची फटकेबाजी आणि जमलेली भट्टी पाहून धडकी भरली होती; पण त्या स्थितीतही आमच्या क्षेत्ररक्षकांनी लढतीचे पारडे न्यूझीलंडच्या बाजूने झुकवले.

योगराज यांची धोनीवर टीका
युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांनी अंबाती रायुडूकडे आपल्याला सिद्ध करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. महेंद्रसिंग धोनीसारखे वाईट खेळाडू नेहमी आपल्या आजुबाजूला नसतील असंही त्यांनी म्हटलं आहे. अंबाती रायुडूने गेल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूत अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, असे म्हणत त्यांनी महेंद्रसिंग धोनीवर टीका केली.

पाक आर्मीला आनंद
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने पाकिस्तानात अनेकांना आनंद झाला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आणि प्रवक्ते आसिफ गफूरही मागे नाहीत. गफूर यांनी न्यूझीलंड संघाला शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे त्यांनी भारताला डिवचले आहे. शानदार विजयासह आयसीसी वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठल्याबद्दल टीम न्यूझीलंडचे अभिनंदन. टीमने खिलाडूवृत्ती दाखवली व एक महान देश नैतिक मुल्यांसह खेळला असे ट्विटमध्ये म्हटले आहे. महान देश, नैतिक मूल्य या शब्दांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताला डिवचले.

फुटीरतावाद्यांचा जल्लोष
भारताचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले. एकीकडे भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असली तरी अंतिम फेरी गाठता आली नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परंतु भारत विश्वचषकातून बाहेर गेल्याचा आनंदही काही जणांना झाल्याचा प्रकार पहायला मिळाला. श्रीनगरमधील काही फुटीरतावाद्यांनी रस्त्यांवर फटाके फोडून भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केला. फुटीरतावाद्यांनी श्रीनगरमधील रस्त्यांवर फटाके फोडून जल्लोष केला. हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये श्रीनगरमधील काही लोक भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करत असल्याचे पहायला मिळत आहे.

तुझ्या खेळाची गरज – मंगेशकर
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या सध्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना लता मंगेशकर यांनी नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे. त्यांनी अजून एक ट्विट करत भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी एक गाणं शेअर केलं आहे.

विराटकडून पाठराखण
धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबाबत काही सांगितले आहे का, यावर कोहली म्हणाला, त्याने आम्हाला काहीही सांगिलेले नाही. धोनीने एक बाजू संयमाने सांभाळत रवींद्र जडेजाला मुक्त फटकेबाजीची संधी देण्याची आवश्यकता होती. त्याने परिस्थितीनुरूप योग्य भूमिका घेतली.

चाहत्यांचे आभार – जडेजा
पराभवावर रविंद्र जडेजाने ट्विटवर भावना करताना म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये. पराभूत झाल्यानंतरही ठामपणे उभं राहणे हे मी शिकलो. चाहत्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. अखेरपर्यंत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!