Type to search

ब्लॉग

तरुणाईला जाणीव झाली!

Share

आरेतील झाडे वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईवर अनेक बाजूने टीका केली जात आहे. तथापि जंगलात जाऊन झाडांसाठी मध्यरात्री झुंजणार्‍या तरुणांपैकी अनेकांना हे माहीत आहे की, सध्या हयात असलेल्या माणसांपैकी दर पाच माणसांत एकाला कॅन्सर होणार आहे व पुढील पाच वर्षांत हे प्रमाण तीन माणसांत एक असे होणार आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. याला कारण वातावरणातील वाढता कार्बन डाय ऑक्साईड वायू व विषारी प्रदूषण आहे. प्राणवायू सतत घटत असताना तो देणारी झाडे वाचवणे म्हणजे स्वतःला वाचवणे आहे, हेही ही मुले जाणतात.या मुलांना हे कळले आहे की, तापमान वाढत आहे आणि ते तसेच वाढत राहिले तर कदाचित ही त्यांची पृथ्वीवरची मानवजातीची शेवटची पिढी ठरणार आहे. त्यांच्या पिढीला कदाचित पुरते आयुष्यही मिळणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे.

या गोष्टी राजकारण्यांना, समाजतज्ञांना माहीत नसाव्यात, यालाही तरुणांचा आक्षेप आहे. पक्षीय राजकारण करण्यात व त्यांच्या राजकीय कुरघोडीच्या खेळात तरुणाईला अजिबात रस नाही. त्यांना माहीत आहे की, पवई तलावातील ‘रेनेसाँ’त राजकीय पक्षांची चिंतन शिबिरे होतात आणि मेट्रो 3 भुयारी रेल्वे प्रकल्प सन 2011 मध्ये काँग्रेसच्या काळात मंजूर झाला आहे.

या तरुणांना समजते की, आता प्रेक्षकाच्या भूमिकेत राहता येणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागेल. टीका करणार्‍यांनी वास्तव समजून घेतले तर त्यांना कळेल की हे तरुण टीका करणार्‍यांनाही वाचवू इच्छितात. त्यांना सांगायचे आहे की, अंदाधुंद विकासाचे युग आता संपले आहे. हे तरुण स्वतःला व्यक्त करू न शकणार्‍या झाडांच्या बाजूने का उभे आहेत. हे सर्व पूर्वग्रह व राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी समजून घ्यावे. पुढील हानी टाळण्यासाठी संवेदनशील तरुणांच्या सहनशक्तीचा अंत सरकारने पाहू नये. माणसांचे, झाडांचे, पशुपक्ष्यांचे शिव्याशाप घेऊ नयेत.

पर्यावरणाच्या बाबतीत जनता संभ्रमात आहे. मला काय त्याचे, माझ्यापर्यंत तर पोहोचले नाही ना, अशी स्वयंकेंद्री भूमिका बव्हंशी समाज घेताना दिसतो. अशावेळी मानव व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी उतरणे हे खर्‍या भारतीयत्वाचे लक्षण आहे.

‘आता विश्वात्मके देवे’ म्हणून प्रार्थना करून संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले विश्वाच्या हिताचे पसायदान हे भारतीय संस्कृतीचे खरे वैश्विकरण होते. हजारो वर्षे निसर्गाशी तादात्म्य पावून भारतीय कृषक ते जगले. तो खरा शाश्वत विकास होता, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.आरेमध्ये वृक्षतोड करणार्‍या तरुणांवर अनेकांनी टीका केली. पण या मुलांना हे कळले आहे की, तापमान वाढत आहे आणि ही त्यांची पृथ्वीवरची मानवजातीची शेवटची पिढी ठरणार आहे.
अ‍ॅड. गिरीश राऊत

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!