तरुणाईचे स्वागतार्ह उपक्रम

0
समस्यांच्या समाधानासाठी आणि रोजचे जगणे सुसह्य होण्यासाठी केवळ शासन यंत्रणेवर अवलंबून राहणे योग्य नाही. लोकसहभागाशिवाय विकास प्रक्रियेला मानवी चेहरा प्राप्त होणार नाही. शासकीय योजना यशस्वी होणार नाहीत, हे आता तरुणाईला उमगले असावे. तरुण बिघडली असल्याचा जावईशोध मागच्या पिढ्या पिढी दरपिढी लावतच असतात. तरुणाईवर बेताल आणि बेछुटपणाचा आरोप केला जातो.

ते सर्वस्वी चुकीचे कसे म्हणावे? पण सरसकट सर्व तरुणाईवर असा आरोप करणे अन्यायकारक ठरेल. कारण विधायक कामात तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस बर्‍यापैकी वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी तरुणाई पुढाकार घेऊ लागली आहे. त्याचे सर्जनशील आविष्कार घडू लागले आहेत.

रस्त्यावरील अपघात आणि संबंधित घटकांची असंवेदनशीलता हे दुर्दैवी चित्र सर्वत्र आढळते, पण अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार अभावानेच घेतला जातो. जखमींकडे काणाडोळा करण्याचीच प्रवृत्ती सर्वत्र दिसते. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागतो.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन नाशिककरांनी ‘ऑपरेशन रेस्न्यू’ या ऍपची निर्मिती केली आहे. मुंबईत झालेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात मुख्यमंत्र्यांनी या ऍपचे अनावरण व कौतुक केले. ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ऍप असेल त्या वाहनचालकाला अपघात झाल्यास त्याच्या परिवारातील तीन सदस्यांना त्वरीत माहिती कळवली जाते. घटनास्थळ, जवळचे पोलीस ठाणे व रुग्णालय यांना तातडीने माहिती कळते. हे ऍप मोफत डाऊनलोड करुन घेता येते.

सध्याच्या वीजदरापेक्षा निम्म्या किंमतीत वीज उपलब्ध करुन देणारे तंत्रज्ञान नाशिकच्याच काही विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. आरशाचा वापर करत वीजनिर्मिती प्रायोगिकरित्या यशस्वी करुन दाखवली आहे. या तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रकल्प साकार करण्यासाठी राज्य शासनाने विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यसुद्धा दिले आहे.

या तंत्रज्ञानाचे पेटंट विद्यार्थ्यांनाच मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तरुणाईतील सर्जनशीलता आणि कल्पनांचे नाविन्य या प्रकल्पांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या आविष्काराला शासनाची आणि समाजातील जाणत्यांची साथ मिळणे गरजेचे आहे. तशी ती मिळाली तर अनेक समस्यांवर शाश्‍वत उपाय शोधणे दृष्टीपथात येऊ शकते. यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराच्या दुष्प्रवृत्तीचा उपद्रव अशा प्रयत्नांना होणार नाही, याची दक्षता कोण घेणार?

LEAVE A REPLY

*