Type to search

अग्रलेख संपादकीय

तरीही वंशाच्या दिव्याचाच अट्टाहास का?

Share

गेल्या चार-पाच वर्षांत अवैध गर्भपात प्रकरणात बाराशेपेक्षा जास्त डॉक्टरांवर कारवाई केल्याचे सांगण्यात येते. काही डॉक्टरांवर खटले दाखल आहेत. काहींची मान्यताही रद्द झाली आहे. राज्यातील दोन-अडीच हजारांपेक्षा जास्त सोनोग्राफी केंद्रे बंद करण्यात आली, अशी माहिती कुटुंबकल्याण विभागाच्या सहसंचालकांनी दिली आहे. मुलींचा जन्मदर घटू नये, मुलीच्या भ्रूणाची गर्भातच हत्या होऊ नये यासाठी शासन व अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. तथापि ‘वंशाच्या दिव्या’साठी दिवटा हट्ट कमी होत नाही.

सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशात 2 कोटी 10 लाख मुली ‘नकोशी’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘मुलगा व्हावा’ अशी इच्छा असणार्‍या दाम्पत्याला मुलगी झाल्यावर तिचे नावच ‘नकोशी’ ठेवले गेले आहे. एक ते पाच वर्षांखालील बालकांत मुलींच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 2016 च्या सरकारी नोंदणी अहवालाचा हा निष्कर्ष आहे. जन्मदात्या आईनेच दहा दिवसांच्या मुलीची हत्या केल्याची घटना परवा नाशिकमध्ये घडली.

त्या दाम्पत्याला पहिल्या दोन मुली आहेत. तिसर्‍यांदासुद्धा मुलगीच झाली म्हणून आई नाराज होती. एक दिवस मुलीचे वडील घरी नाहीत हे पाहून तिने आपल्याच अश्राप मुलीची गळा दाबून व डोक्यात प्रहार करून हत्या केली. बालिकेच्या वडिलांनीच शवविच्छेदनाची मागणी केली होती. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. या घटनेपूर्वी बारा दिवस आधीच त्या कुटुंबातील दुसर्‍या मुलीचा मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला सर्व क्षेत्रात मुलीच जास्त हुशार ठरत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षा निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

महिला अंतराळात पोहोचल्या आहेत. लढाऊ वैमानिक झाल्या आहेत. प्रपंच चालवण्यासाठी ट्रक, रिक्षाचालक बनल्या आहेत. क्वचितच एखादे क्षेत्र वगळता सर्वत्र मुलींनी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले आहेत. तरीही पालकांना मुली आजही हव्याशा का वाटत नाहीत? ‘मुलगाच व्हावा’ असा अट्टाहास का केला जातो? स्वत:चे घरदार असूनही अनेक मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडतात.

दोन मुलांनी आपल्या आईवर रेल्वे स्थानकावर भीक मागायला लावल्याची घटना नाशिकमध्ये नुकतीच उघडकीस आली. वंशाच्या दिव्यांचे असे अनेक दिवटे उपद्व्याप चालू आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे भीषण सामाजिक परिणाम सहन करावे लागत आहेत. असे असतानाही समाजात जागरुकता निर्माण का होत नाही याची कारणे शोधणे हे समाजतज्ञांसमोरचे मोठेच आव्हान आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!