Type to search

अग्रलेख संपादकीय

तरीही नियम का मोडले जातात?

Share
जानेवारी ते एप्रिल 2019 या काळात राज्यातील 30 लाखांपेक्षा जास्त वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम तोडले. त्यांच्याकडून जवळपास सत्तर कोटींचा दंड वसूल करण्यात आला. ही आकडेवारी राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलाने दिली आहे.

राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियम मोडतात. वाहतूक नियम उल्लंघनात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे निरीक्षणही या दलाने नोंदवले आहे. अपघातांतही महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. 2017-18 मध्ये राज्यात पस्तीस हजारांपेक्षा जास्त छोटे-मोठे अपघात झाले. त्यात बारा हजारांपेक्षा जास्त जणांचे बळी गेले. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अतिवेगात चालवणे, दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर न करणे ही अपघातांमागची नेहमीची प्रमुख कारणे आहेत.

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार 2016-17 मध्ये देशात तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा बळी गेला. त्यातील ऐंशी टक्के मृत्यू चालकाच्या चुकीमुळे झाले आहेत. वाहन चालवताना झालेली क्षुल्लक चूक वा दुर्लक्ष जिवावर बेतू शकते हे माहीत असूनही वाहनचालक नियम का मोडतात? धोका का पत्करतात? या कोड्याचा उलगडा होणे कठीणच! नियम मोडणार्‍यांवर कारवाई होते. दंडवसुली होते. कोणत्याही प्रकारे दंडुक्याचा वापर न करता पोलीस दलाने सत्तर कोटींची रक्कम वसूल केली.

तरीही नियम मोडणार्‍या वाहनचालकांची संख्या व दंडवसुलीची रक्कम दिवसेंदिवस वाढतच आहे. नियम मोडण्यात वाहनचालकांना कोणते समाधान मिळते? कदाचित आपली क्षुल्लक चूक आणि नियमबाह्य कृतीमुळे शासनाला कोट्यवधींचा निधी मिळतो व शासकीय जनहिताच्या योजनांसाठी अप्रत्यक्षरीत्या आपला हातभार लागू शकतो हे विचित्र समाधान मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकेल का? मनुष्य स्वभाव आजवर अनाकलनीयच राहिलेला आहे. त्यामुळे हा तर्क केवळ विनोदी समजण्याचे कारण नाही.

नियमाबाह्य पद्धतीने वाहन चालवून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणार्‍या बेजबाबदार वाहनचालकांचे वाढते प्रमाण हा दिवसेंदिवस अधिकाधिक चिंतेचा विषय बनत आहे. फक्त दंडात्मक तरतूद हा यावरचा ठोस उपाय नाही. वाहन परवाना देण्याचे नियम काळानुसार बदलायला हवेत. पालकांनीही मुुलांच्या हाती वाहन सोपवताना मुलांमध्ये नियमांविषयी जागरुकता निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे; पण हे व्हावे कसे? हा यक्ष प्रश्न उरतोच.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!