तमाशा फड ‘चार भिंती’ आड

‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’मुळे तमासगिरांची असमर्थता

0

दिगंबर शहाणे

देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रा म्हणजे नाशिकरोडचे मुख्य आकर्षण समजले जाते. गेल्या ८० वर्षांपासून ही यात्रा अखंडितपणे सुरू आहे. यात्रा म्हटले म्हणजे तमाशा फड आलाच! तमाशाशिवाय यात्रेची मजाही असू शकत नाही. पूर्वीपासून सुरू असलेल्या या प्रत्येक यात्रेत तमाशाचा फड रंगत असे. परंतु गेल्या ४-५ वर्षांपासून तमाशाचा फड या यात्रेत येण्यास इच्छुक नसतात.

सद्यस्थितीत तमाशा कलाकारांना असंख्य अडचणी व पुरेसे आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने या यात्रेत येण्यास कलावंत असमर्थता व्यक्त करतात. यंदा तमाशा झाला, परंतु त्याला पूर्वीची रंगत आली नाही. कारण पूर्वी तमाशा फड मोकळ्या मैदावरील तंबूमध्ये होत असे. आता टाऊनहॉलमध्ये चार भिंतीच्या आत झाल्यामुळे पूर्वीची खरी मजा गायब झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीतील मुख्य घटक असणारा तमाशा फड हा प्रत्येक यात्रेचा आकर्षण बिंदू असतो. ग्रामीण भागात तर तमाशांना इतकी गर्दी होते की, हे तमाशा फड रात्रभर चालतात. यातून अनेक कलावंत निर्माण झाले आहेत. एकेकाळी देवळालीगावच्या या यात्रेत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन-चार तमाशांचे तंबू आठवडे बाजारातील मैदानात उभे रहात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तमाशा फड येऊनही रसिकांची गर्दीही असायची.

मात्र गेल्या काही वर्षांपासून तमाशातील कलावंतांना मद्यपी व टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मनपाकडून आकारण्यात येणारे अवाढव्य भाडे, पोलीस परवानगी व इतर परवानग्यांसाठी होणारा मनस्ताप तमाशा कलावंतांना झेपत नाही. त्यातही फुकट्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत होते. या सर्व अडचणींमळे तमाशा कलावंतांना फड रंगविणे शक्य होत नाही. परंतु पंच कमिटीच्या आग्रहास्तव तमाशा पार्टी आपली कला सादर करतात.

फुकटे व मद्यपींचा त्रास तसेच तमाशा सुरू झाल्यानंतर रंगमंचावर मद्यपींचा धिंगाणा यामुळे रसिकांना तमाशा कलावंतांची कला बघण्याऐवजी मद्यपींचाच ‘तमाशा’ बघावा लागत असे. तमाशा कलावंतांना उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी गत झाल्यामुळे तमासगीर या यात्रेकडे पाठ फिरवतात. मात्र गेल्या वर्षापासून येथील टाऊनहॉलमध्ये तमाशा फड रंगत आहेत.

एकेकाळी ही यात्रा म्हणजे आठ दिवस आधीच सुरू होत असे व कुस्त्यांची दंगल झाल्यानंतर चार ते पाच दिवस सुरू रहायची. परंतु आता ही यात्रा केवळ तीन दिवसांतच आटोपती घ्यावी लागते. पूर्वी रात्रभर यात्रेत गर्दी दिसून येत होती. भाविकही यात्रेची मजा लुटत असे. परंतु आता रात्री १० वाजताच पोलिसांच्या शिट्ट्या सुरू होतात.

त्यामुळे यात्रेला येणारे भाविकही पोलिसांच्या दंडुक्याला घाबरतात. तसेच व्यावसायिकही नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांच्या दबंगगिरीला घाबरून असतात. त्यामुळे पूर्वीची यात्रा ही आताची यात्रा राहिली नाही.

LEAVE A REPLY

*