ढगाळ हवामानामुळे द्राक्षोत्पादक चिंतेत

थंडी वाढणार अन् ढगाळ वातावरणही..

0

नाशिक | दि.१० प्रतिनिधी- गेल्या तीन दिवसांपूर्वी राज्यातील हवामानात अचानक बदल होऊन विदर्भात गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आता मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट होऊन थंड वारे वाहू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेले ढगाळ वातावरण अजून चार-पाच दिवस राहणार असून किमान तापमान अजून खाली जाऊन हवेतील गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत विदर्भात काही भागात पारा ३८ अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा चटका बसत होता. कमाल तापमानात विदर्भात वाढ होत गेल्याने त्यानंतर लगेच या भागात पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागात गारादेखील पडल्या होत्या. याचा परिणाम आता मध्य महाराष्ट्रात जाणवू लागला आहे.

कोकण गोवाच्या काही भागात गेल्या दोन दिवसात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट होऊन अचानक पारा खाली आला आहे. परिणामी मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

या हवामानातील बदलामुळे शीतलहरी वाहू लागल्याने उन्हाच्या झळांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अशाप्रकारे कमाल तापमान ३० अंशाच्या आत आल्याने दिवसा थंड वारे वाहू लागले आहेत. या बदललेल्या वातावरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

विदर्भाप्रमाणे पाऊस पडला तर काय? अशी चिंता शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोरात सुरू असतानाच बदललेल्या वातावरणामुळे आणि वाढलेल्या थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षांना मोठा अडसर निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याने त्याचे परिणाम उत्तर महाराष्ट्रात दिसू लागले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आज १०.८ अंंश असे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.विदर्भात सर्वात जास्त कमाल तपमान चंद्रपुर जिल्ह्यात ३६.८ अंश असे नोंदविले गेले. गेल्या तीन चार दिवसापुर्वी नाशिक जिल्ह्याचे कमाल तपमान ३० ते ३४ अंशावर असतांना आज येथील पारा घसरुन कमाल तपमान २८.६ अंशावर आणि कमाल तपमान १२.९ अंश सेल्सीअस अशी नोंद झाली.

आज निफाड येथे ९.८ अंश असे निच्चांकी किमान तपमानाची नोंद झाली आहे. मालेगांव व जळगांव जिल्ह्यात पारा ३६ ते ३४ अंशापर्यत होता. नाशिक जिल्ह्यात बुधवार (दि.८) रात्रीपासुन हवामानात बदल होऊन दिवसाही ढगाळ वातावरणाबरोबर गार वारे वाहत आहे. उन्हाचा चटका आणि गार वारे असा संगम बघालया मिळत आहे. तर आज दिवसभर ढगाळ वातावरण टिकुन असतांना दिवसभर थंड असे वादळी वारे वाहत होते. या एकुणच प्रकारामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

निर्यातक्षम द्राक्षांवर थंडीचा परिणाम
जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोरात असून निर्यातक्षम द्राक्षांतील द्राक्ष मण्यांतील साखरेचे प्रमाण १६ किंवा त्यापेक्षा जास्त असावे लागते. मात्र बदललेल्या वातावरणातून वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांतील साखरेचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांवर परिणाम झाला आहे. साखरेचे प्रमाण कमी असल्यास निर्यातदार कंंपन्या अशी द्राक्ष स्वीकारत नाही. यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.

पावसाची शक्यता नाही
जिल्ह्यात निर्माण झालेले वातावरण अजूनही चार-पाच दिवस टिकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अजूनही किमान तापमान खाली जाण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणदेखील कायम राहणार आहे. मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नसल्याने शेतकर्‍यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*