डोळस तरुणाईची आयडॉल… अंधार मैत्रेयी प्रांजल पाटील

0

….ती जेम-तेम आठ-दहा वर्षाची, अगदी चार-चौघींसारखीच वर्गात दंगा करायची… घरी आईमागे खाऊसाठी पिंगा घालायची. वडील ऑफिसमधून परतले की, त्यांच्या अंगा-खांद्यावर लोळण घ्यायची… अनेकदा समोरच्या बागेतील फुलपाखरांचा पाठलाग करुन त्यांचे सप्तरंग डोळ्यात साठवायची… आपल्या लहान भावाला कधी चिडवत, तर कधी लाडीकपणे खेळवायची. लहर आली की,

पप्पांनी आणलेल्या ड्रॉइर्ंग बुकवर छान चित्रे काढायची, त्यात सुरेख रंग भरायची… सारं कस गोकुळातल्या भरल्या घरासारख तृप्त आयुष्य जगत प्रांजलच आयुष्य तेजाळत होतं…. पण अचानक प्रकाशमय झालेल्या मुग्ध आयुष्यात कातरवेळीचा अंधार पसरला… प्रांजलच्या आई-वडील आणि कुटुंबियांवर मोठा आघात कोसळला…. यावल तालुक्यातील निमगाव येथे मामाच्या गावी उन्हा-तान्हातून खेळून आलेल्या प्रांजलने जसा घरात पाय ठेवला, तसं घरातील गार-गार हवेत, तिचं आयुष्य तप्त झाल्याच्या खुणा तिला जाणवायला लागल्यात..

क्षणभर काय होतय, हे तिला कळण्याआधीच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला… मम्मी, तू कुठे आहेस… पप्पा तुम्ही मला दिसत का नाहीत… भैय्या… मामा… मामी… घरातील प्रत्येक सदस्याला जीवाच्या आकांताने आक्रंदून प्रांजळ साद घालीत होती… कारण तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार दिसत होता! या आधीही अधून-मधून तिच्या डोळ्यांच्या कुरबुरी जाणवत होत्या. त्यावर ईलाजही सुरु होते, पण अचानक प्रांजलची दृष्टीच नाहीशी होईल, हा विचार पाटील कुटुंबियांच्या स्वप्नातही शिवला नव्हता…. तापलेल्या उन्हातून खेळून आली आणि लगेच घरातील कुलरच्या गारव्यात शिरल्याने डोळ्यासमोर झाकोळ आली असेल म्हणून सार्‍यांनी समजूतही काढली, पण ती झाकोळ क्षणाची नव्हतीच मुळी… ती झाकोळ… तो अंधार आयुष्याला पुरणारा होता… तातडीने वैद्यकीय उपचार केलेत… वडील लहेनसिंग पाटील यांनी जंग जंग पछाडले…

दिमतीला असलेला सारा पैसा प्रांजलच्या डोळ्यासाठी रिता केला, माझ्या चिमुकल्या पोरीने पुन्हा मला डोळे भरुन पाहिलं पाहिजे…पप्पा म्हणत, तिच्या आवडीच्या वस्तु-खेळणी खरेदी करण्यासाठी हट्ट धरला पाहिजे… ड्रॉईंग बुकवरील काढलेली चित्रे आईला कौतुकानं दाखविली पाहिजे… माझ्या पोरीनं पुन्हा डोळे भरुन हे जग पाहिले पाहिजे…. यासाठी पाटील कुटुबियांनी जीवाचं रान केलं, पण नशिबापुढें कुणाचं काही चाललं नाही… प्रांजलच्या वाट्याला काळोखाच रानं आलं… सार्‍यांचा धीर सुटला! आई-वडील आप्तस्वकीय…. सारेच नियतीपुढे हतबल झाले… आणि अंधारयात्रेत बुडालेल्या चिमुकल्या प्रांजलने कणखर होत निर्धार केला… सावकाश वडिलांचा ठाव घेत… चाचपडतच पप्पांचा हात हातात घेत, ती दुणावलेल्या आत्मविश्वासानं म्हणाली… पप्पा मला शिकायचय, खूप खूप मोठं व्हायचय… पप्पा-मम्मी मला कलेक्टर व्हायचय…! तिच्या नेत्रहीन डोळ्यातला हा डोळस-अदम्य आशावाद पाहून लहेनसिंग पाटीलसुध्दा अवाक झाले… पोरं जिद्दीची होती, हे त्यांना ठाऊक होत. काळजातले अश्रू पुसत, प्रांजलच्या आत्मविश्वासाला हिंमतीच पाणी द्यायला पाटील परिवार सज्ज झाला… अणि बघता-बघता अंधत्वाने लुप्त झालेली प्रांजल जिद्दीने कलेक्टर झाली! पण बालपणी आलेलं अंधत्व ते कलेक्टर… हा प्रवास जसा प्रांजलसाठी कठीण होता, तितकाच तो तिच्या मम्मी-पप्पांसाठी वेदनादायी होता… डोळ्यातल्या धारांना वाट करुन देत, त्यांनी प्रांजलला घडविण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावल…

हर रोज मर कर भी
मुकम्मल खडे है ।
ऐ जिंदगी देख,
मेरे हौसले तुझसें भी बडे है ॥

…असा अदम्य आशावाद लेऊन आंधळ्या प्रांजलचे एक चक्षू पप्पा तर दुसरे चक्षू मम्मी बनली, आणि जगासमोर डोळस तरुणाईलाही लाजवेल अशी यशोगाथा प्रांजलने निर्माण केली. आज आपणाकडे सर्वकाही असूनही आयुष्यातील एखादा यशाचा टप्पा गाठण्यासाठी मनोबल चाचपडणारी तरुणाई पाहिली की, प्रांजलचे संघर्षमय जीवन दीपस्तंभासम उभे राहते.
जन्मांध असलेली व्यक्ती आणि तिचे जगणे हे निश्चितच खडतर आणि आव्हानात्मक असते, यात शंका नाही, पण जन्मल्याानंतर आठ-दहा वर्षे हे रंगबिरंगी जग पाहिल्यानंतर अचानक दृष्टीबाधा निर्माण होऊन अंधत्व लादलेल्या आयुष्याला आकार देणं सोप नसतेच! पण प्राजलने हे आयुष्याचे कठीण गणित सोपे करून दाखवले!

ज्योतीताई बनली तिची ज्योत!
कुटूंबाच राहाट गाडगं चालवायच असेल, तर नोकरी-उद्योग करून पैसा मिळविण्यासाठी बाहेर पडावच लागत… लहेनसिंग बाबुराव उर्फ एल.बी.पाटील यांचीही या धबडग्यातून सुटका होणार नव्हती. त्यामुळे गृहीणी असलेल्या ज्योतीताईंवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली होती. एल.बी.पाटलांच्या सौभाग्यवती व प्रांजलच्या मातोश्री ज्योतीताई प्रांजलच्या डोळ्याची ज्योत बनल्या… अभ्यासाला प्रांजलने सुरूवात केली की, ज्योतीताई अभ्यासाची पुस्तके वाचून दाखवायच्या! डॉ.हेलन केलर, महात्मा गांधी, डॉ. डी. इकेडा… अशा अनेक महान व्यक्तींची प्रसिध्द आत्मचरित्रे ज्योतीताई प्रांजलला ऐकवित. त्यामुळे तिच्या मनामध्ये आपण काहीतरी भव्य दिव्य करून दाखवावे, असा निर्धार पक्का होत गेला. त्यातच अंधकल्याणाच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या हेमंत पाटील यांच्याशी पाटील कुटूंबियांची गाठ पडली. त्यांनी उल्हासनगरला प्रांजलच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रांजलला सखोल मार्गदर्शन केले आणि दादरच्या मेहता अंधशाळेत तिला दाखले केले. तेथे तिचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. या काळात तिचा मोठा आधार म्हणजे तिचा ‘आय’ बनलेली तिची ‘माय’ होती. व सोबतच पहाडांएवढ्या संकटाला टक्कर देणारा बाप होता.

पिता, एल.बी.पाटलांचे व्हिजन
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण चांदीबाई कॉलेजात घेतल्यानंतर प्रांजलने बारावीत 85 गुण मिळवून कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळविला. आणि तिचा आत्मविश्वास दुणावला. नंतर सेंट झेवियर महाविद्यालयातून पहिली आली. दरम्यानच्या काळात वडिल एल.बी.पाटलांनी तिची संगणकाशी गट्टी करून दिली होती. अंधांच्या विश्वासमध्ये जे.जे.काही नवीन घडत आहे, त्याबद्दल माहिती घेऊन उपलब्ध करण्याचा सपाटा पिता एल.बी.पाटील करीत होते. ‘जॉज’ नावाच्या स्क्रिन रिडींग सॉफ्टवेअरमुळे प्रांजलला संगणक हाताळणे सोपे जाऊ लागले होते. त्यामुळे तिचे वाचन आणखीच प्रगाढ होऊ लागले आणि सकस अशा वाचनामुळे तिचा मेंदू सुध्दा प्रबुध्द होत गेला. व तिच्या मनाला बालपणीचा हुंकार आठवला. तिने निर्णय घेतला, लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देण्याचा मनोदय पप्पांसमोर तिने व्यक्त केला. वडिल तर तिच्यासाठी व्हीजन होतेच, त्यांनी पै-पैशांचा विचार न करता, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘एम.फील’ करण्यासाठी प्रांजलचा प्रवेश निश्चित केला. दरम्यानच्या काळात विद्यापीठात आयोजित केेली जाणारी चर्चासत्रे आणि सर्वांगिण विकासाचे कार्यक्रम याचा लाभ प्रांजलने अचूक करून घेतला. त्या ठिकाणच्या प्राध्यापकांनीही तिच्या ज्ञानपिपासू प्रवृत्तीला साद देत, मदत केली आणि एमफीलची परीक्षाही तिने यशस्वी करून दाखविली.

कोमलसिंग बनले जीवनसाथी
कलेक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या प्रांजल सोबत सातत्याने व कणखरपणे उभा राहणार्‍या जीवनसाथीचा शोध सुरू होताच, वेळीच आपल्या प्रांजलचे कन्यादान व्हावे, ही स्वाभाविक अपेक्षा एल.बी.पाटील यांची होती आणि आयुष्यात सत्कर्म करीत असलेल्या पाटील कुटूंबियांची ही ईच्छा फलद्रुप झाली. 2014 मध्ये ओझरखेडा येथील केबल व्यावसायिक कोमलसिंग पाटील यांनी प्रांजलसोबत विवाह केला. आणि प्रांजलच्या स्वप्नास आकार देण्यासाठी ज्योतीताई व लहेनसिंग पाटील यांच्या समवेत कोमलसिंग यांनीही चंग बांधला.2016 च्या युपीएससी परीक्षेत देशात 773 व्या रँकमध्ये प्रांजल उत्तीर्ण झाली. त्यावेळीही तिला मोठ्या पदाच्या नोकर्‍या मिळाल्या, पण जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते.

पुन्हा 2017 च्या युपीएससी परीक्षेत तिने बाजी मारली आणि देशात 124 व्या रँकने तर महाराष्ट्रात 11 व्या क्रमांकाने दृष्टीबाधीत प्रांजल उत्तीर्ण झाली. आणि कलेक्टर बनण्याचा तिचा मार्ग सुकर झाला.

आज प्रांजल पाटील केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्याच्या असिस्टंट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. लवकरच त्या एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून स्वतंत्रपणे कारभार पाहतील…खान्देशकन्या, जिल्हाधिकारी सौ.प्रांजल कोमलसिंग पाटील यांना मानाचा… सॅल्यूट!

मनी बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांपुढे कमकुवत ठरते.जळगांव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील वडजी या गावातील प्रांजल लहेनसिंग पाटील यांनी अशीच भरारी घेतली, बालपणी दृष्टीबाधित झाल्यानंतर अपंगत्वावर मात करीत जिल्हाधिकारी पदापर्यंत पोचलेल्या प्रांजलचा प्रवास डोळस व्यक्तीसाठीही प्रेरणादायी आहे…कलेक्टर प्रांजल ताईंच्या जिद्दीला कडक सॅल्यूट, आज चावडीवर…!

पुरुषोत्तम गड्डम – भ्रमणध्वनी – 9545465455

LEAVE A REPLY

*