डॉ. तनपुरे कारखान्याच्या कर्जाचे 15 दिवसांत पुनर्गठण : आ. कर्डिले

0

.. तर सामूहिक राजीनामे :  डॉ. विखे

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 88 कोटी रुपयांच्या कर्जाचे येत्या 15 दिवसांत पुनर्गठण करून कारखाना विद्यमान संचालक मंडळाच्या हाती सुपूर्द करू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे. कर्डिले यांच्या सहकार्यातून उतराई होण्यासाठी भविष्यात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द डॉ. सुजय विखे यांनी दिला.

 
डॉ. तनपुरे कारखाना कार्यस्थळावर सभासद, कामगार व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आ. कर्डिले बोलत होते. प्रारंभी सभासद व कामगार कृती समितीच्या वतीने आ. कर्डिले व डॉ. विखे यांचा सत्कार करण्यात आला. संचालक शिवाजीराव गाडे यांनी कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी संचालक, सभासद व कामगारांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी. 55 वर्षे कारखान्याच्या माध्यमातून प्रचंड विकास झाला. मात्र, चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याने कारखान्याची वाताहात झाली. सभासदांच्या 12 कोटी रकमेचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती डॉ. विखे यांना करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

 
आमदार कर्डिले म्हणाले, डॉ. तनपुरे कारखाना सुरू रहावा, या भावनेतून मदत केली. शेतकर्‍यांच्या व कामगारांच्या हितासाठी 44 कोटी रुपये कर्ज दिले. त्यानंतर सत्तांतर झाले. प्रसाद तनपुरे यांना जिल्हा बँकेचे कर्ज परत करा, पुन्हा मदत करतो, अशी विनंती केली. मात्र, तनपुरे यांनी परदेशी बंँकेतून कर्ज घेण्याची वल्गना करून तारण साखर विकली. कारखान्याच्या जमिनीची थोडी-थोडी करून होणारी विक्री आम्ही थांबविली. कारखान्याच्या भवितव्यासाठी आम्ही कारखान्याची निवडणूक लढविली नाही. मात्र, ज्या संचालक मंडळाच्या ताब्यात सत्ता येईल, त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. डॉ. विखे यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळास सहकार्य करीत आहे. पुनर्गठणानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ व सरकारी देय रकमेचे हप्ते पाडून घेऊ, असे त्यांनी सांगितले.

 
डॉ. सुजय विखे म्हणाले, डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीत सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे कारखाना सुरू करण्यासाठी मी व संचालक मंडळाने गेले वर्षभर कष्ट घेतले आहेत. आ. कर्डिले यांनी पुनर्गठणासाठी सहकार्य केले आहे. मात्र, कर्ज पुनर्गठण झाल्याने प्रश्‍न सुटणार नाही. अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. बॉयलर टर्बाईन, मिल व इतर कामांसाठी 12 कोटी तर ऊस तोडणी कार्यक्रमासाठी 6 ते 7 कोटी, व अन्य खर्च पाहता 25 कोटींची त्वरीत आवश्यकता भासणार आहे. 150 दिवस एक मिल सुरू ठेवून चार लाख टन उसाचे गळित असे आम्ही नियोजन केले आहे.

 

सभासदांच्या थकीत रकमेच्या 50 टक्के रक्कम कारखाना सुरू होण्यापूर्वी अदा केली जाईल. कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात सुपूर्द झाल्याच्या दुसर्‍या दिवशी सर्व कामगारांना कामावर हजर करून घेतले जाईल. भविष्य निर्वाह निधीची पाच कोटींची रक्कम पहिल्या हंगामात अदा केली जाईल. कारखाना सुरू करण्याचे ‘अग्निदिव्य’ आम्ही स्वीकारले आहे. मात्र, हे सर्व करताना सभासद व कामगारांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, सभासदांनी एक वर्ष आमच्यावर विश्‍वास ठेवून गळितासाठी येथे ऊस द्यावा, प्रवरेला या भागातून वर्षांनुवर्षे येणारा दोन लाख टन ऊस मी राहुरीकडे वळविणार नाही.

 

प्रवरेचा जो भाव राहील, तोच राहुरीच्या सभासदांना दिला जाईल. यापुढे कारखान्याच्या गेटवर कोणतेही आंदोलन चालणार नाही. कामगारांनी शिस्त पाळावी. गेटच्या आत राजकारण करू नये. ऊसतोडणीचा शिस्तबद्ध कार्यक्रम राबवून रिकव्हरी 12 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर कर्जमुक्तीच्या दृष्टीने वाटचाल सुरू करू. कारखाना कर्जमुक्त होईपर्यंत अतिथीगृह बंद राहिल. संचालकांना वाहने व भत्ता दिला जाणार नाही. सभासद व कामगारांनी सहकार्य केले नाही तर प्रसंगी सामूहिक राजीनामे देऊन निघून जाण्याचा इशारा डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे.

 
यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, मच्छिंद्र तांबे, महेश पाटील, शिवाजी गाडे, विजय डौले, दत्तात्रय ढूस, अशोक खुरूद, हौसाबाई चौधरी, पार्वतीबाई तारडे, रावसाहेब चाचा तनपुरे, सुरेश करपे, उत्तमराव म्हसे, आसाराम ढूस, सतीश सौदागर, संदीप गिते, नानासाहेब गागरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, नामदेव ठोकणे आदींसह सभासद व कामगार उपस्थित होते. राजेश मंचरे व गणेश विघे यांनी सूत्रसंचालन केले.

 

आ. कर्डिले व डॉ. विखे यांंनी आपल्या भाषणातून एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. प्रसंगी कोपरखळ्याही लगावल्या. डॉ. विखे म्हणाले, कर्ज पुुनर्गठणासाठी कर्डिलेंनी मोलाची मदत केली हे खरे आहे. मात्र, ‘लोहा गरम है, हातोडा मारो’ याप्रमाणे योग्य संधीची वाट पाहिली. कर्डिले सहजासहजी कुणाच्या हातात येत नाही. तुम्ही पुढील 50 वर्षे याच मतदारसंघाचे आमदार रहा, अशा कोपरखळ्या मारल्या. तर कर्डिले म्हणाले, डॉ. विखे हे वयाने लहान आहेत. मात्र, राजकारणात ते माझ्यापेक्षा तरबेज आहेत. पुनर्गठणासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कामगार व सभासदांना वारंवार माझ्याकडे पाठवून मला शेवटी तयार केलेच. विखेंनी राहुरीच्या सभासदांना प्रवरेपेक्षा कमी भाव दिला तर सभासदांची भरपाई करून देण्याची हमी त्यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*