डॉ. तनपुरे कारखाना सुरू करणार ः सुजय विखे

0

कामगार, सभासदांना न्याय देण्यासाठी प्रयत्न

लोणी (प्रतिनिधी) – कामगार, सभासद आणि व्यवस्थापन ही सहकारांची त्रिसूत्री आहे. आजपर्यत चांगले काम सहकारी चळवळीत केल्यामुळेचं राज्यात प्रवरेचा आदर्श आहे. डॉ. तनपुरे कारखाना देखील आपणच सुरू करून कामगार आणि सभासदांना न्याय देऊ असे प्रतिपादन डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले.
पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित महाराष्ट्र दिन आणि कारखाना व्यवस्थापन आणि कामगार युनियनच्या वतीने गणेश आणि विखे पाटील कारखान्यांच्या सेवानिवृत्त सेवकांच्या सत्कार प्रसंगी डॉ. सुजय विखे बोलत होते.

कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, संचालक विक्रांत विखे, प्रतापराव तांबे, भाऊसाहेब चेचरे, शिवाजी घोलप यांच्यासह सर्व संचालक मधुकर चौधरी, ए. के. भागडे, संजय मोरे, डी. यू. खर्डे आदींसह गणेश आणि विखे पाटील कारखान्याचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.

कामगार हा विकासाचा मुख्य घटक आहे. आज आपल्या सर्वच संस्था प्रगतिपथावर आहेत. आपण सुरू केलेला वीज निर्मिती प्रकल्प राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नंबर एकवर आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. हमी भावात आघाडी, व्यवस्थापन, रिकव्हरीत आघाडीवर असताना देखील आपणास पुरस्कार मिळत नाही.

पुरस्कारापेक्षा सभासद, कामगार यासाठीच आपण काम करतो. पद्यभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कामगारांना नेहमीच सन्मान दिला. आजपर्यत सहकारात सभासद, कामगार आणि व्यवस्थापन या त्रिसूत्रीवरच प्रगती झाली.

कारखाना हे सत्ता केंद्र नाही. सहकारी संस्था या लोककल्याणासाठी आहेत. सहकारी संस्थेमध्ये काटकसर, यांत्रीकीकरण आणि कठोर निर्णय घेऊन पुढे जावे लागणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून विकास कामे करताना यापुढे लोकसहभाग असण्याची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे. सध्याच्या सरकारने सहकारी साखर उद्योग आणि यातून उभ्या राहिलेल्या संस्थांचे खाजगीकरण कसे करता येईल यासाठी पुढाकार घेतला आहे. असे डॉ. सुजय विखे यांनी सांगून बंद गणेश सुरू करण्यासाठी जवळपास 10 कोटींची गुंतवणूक त्यात केली.

 

डॉ. तनपुरे देखील आपण पुढील वर्षी सुरू करणार आहोत. ना. राधाकृृृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून काम करता उच्चांकी ऊसदर आणि उच्चांकी पगार घेणारा कामगार हेच आपले ध्येय असणार आहे. डॉ. तनपुरे कारखाना देखील विखे पाटील कारखान्याकडून सुरू केला जाणार आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगतानाच त्या कामगारांना देखील आपल्याप्रमाणेचं न्याय दिला जाईल. पण कारखाना हा आपला आहे अशा भावनेतून काम करावे. हा कारखाना चालविताना त्यांचा भुर्दंड विखे पाटील कारखान्यावर पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. मोठे पगार लवकरच होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. पुढील वर्षी विखे पाटील कारखाना उच्चांकी भाव देऊन नऊ लाख टन, गणेश तीन लाख टन तर डॉ. तनपुरे चार लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी कामगार नेते ज्ञानदेव आहेर यांनी प्रास्ताविकात डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी होत असतो. विखे पाटील कारखाना नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभा असल्यामुळेच प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. यावेळी गणेश आणि विखे पाटील कारखान्याचे कामगार उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*