‘डॉ. तनपुरे’च्या कर्ज पुनर्गठणाच्या ठरावाला मंजुरी

0

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- डॉ. तनपुरे कारखान्याकडील थकीत 88 कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक वर्पे यांनी दिली.

 
राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणार्‍या तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे 44 कोटींचे कर्ज आहे. मात्र, त्याची परतफेड न झाल्याने व्याजाचा फुगवटा वाढत जाऊन ही रक्कम व्याजासह 88 कोटींवर पोहोचली आहे.

 

त्यामुळे आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना गेल्या चार-पाच वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यानंतर सत्तांतर होऊन डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सुत्रे आल्यानंतर शेतकर्‍यांसह तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 
कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. त्याचे मुल्यांकन करण्यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कंपनीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. तनपुरे कारखान्याकडे असलेल्या 88 कोटींच्या कर्जास पुनर्गठण देण्यास अडचण नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. तनपुरे कारखान्याच्या कर्ज पुनर्गठणाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*