डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी निवृत्त पोलिसांची वर्णी ; पालकमंत्र्यांची घोषणा ; सुरक्षारक्षकांची 1100 पदे भरणार

0

नाशिक : डॉक्टरांवर होत असलेले हल्ले गंभीर आहेत. डॉक्टरांना मारहाण होणे ही निंदनीय घटना आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात सुसंवादाचा अभाव आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा विषय आम्ही गांभीर्याने घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील शासकीय रुग्णालये, 16 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षेसाठी 1100 कर्मचार्‍यांची त्वरित भरती केली जाणार असल्याची घोषणा केली.

डॉक्टर मारहाण प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असून आज निवासी डॉक्टरांनी एकदिवसीय रजा आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर नाशिक दौर्‍यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना या प्रश्नी विचारले असता ते म्हणाले, गेल्या आठवडाभरात राज्यात डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला करण्याचे तीन प्रकार घडले. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

त्या पार्श्वभूमीवर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. सध्या 16 महाविद्यालयांसाठी 250 सुरक्षा कर्मचारी असून 1100 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. खासगी संस्थांकडून सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली तरीही फार काही फरक पडत नसल्याने आता पोलीस महामंडळाकडून कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यांनीही त्यास प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता लागलीच निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती केली जाणार आहे. ते या संपूर्ण ठिकाणांची माहिती घेऊन लागलीच नियुक्त्याही केल्या जातील. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्याला काही अंशी आळा बसेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*