डीजेचा दणदणाट; नीलेश म्हसेसह 14 जणांवर गुन्हा दाखल

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केल्याप्रकरणी पोलिसांनी जप्तीची कारवाई केली. मावळा प्रतिष्ठानचे निलेश म्हसे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ध्वनीप्रदुषण व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी निलेश म्हस्के, खजिनदार अक्षय अशोक उमाप, दानिश शेख, आकाश ओमप्रकाश झांझोट, अर्जुन किशोर पोटे, विशाल लक्ष्मण शिंदे यांच्यासह अन्य आठ अशा 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साठे जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत शहरातील पाच मंडळांनी सहभाग घेतला होता. ढोल, ताशे व डिजेच्या दणदणाट करत पिवळे व निळ्या झेंड्यांसह कार्यकर्त्यांनी जन्मोत्सवाची मिरवणूक काढली. बुधवारी (दि.1) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, नेता सुभाषचौक, चितळेरोडवरून मिरवणूक दिल्लीगेटमधून बाहेर पडली. निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीत मावळा प्रतिष्ठान मंडळाने डिजेच्या आवाज वाढविला. आशा टॉकीज चौकात असताना डिजे अचानक बंद पडला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह काहीसा मावळला. डिजेचा आवाज प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळे कोतवाली पोलिसांनी डिजे ताब्यात घेतला. डिजेच्या सोबत तीन बँन्ड पथकही होते. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करुन कर्कश आवाज काढणारे तीन डिजे सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या हाती मात्र एकच डिजे लागला. कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका डिजेवर सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या फिर्यादीनुसार कारवाई करण्यात आली असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीस हाय…हाय…! पोलीस हाय…हाय…!  दिल्ली गेट येथे मिरवणूक आल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी तिन्ही डिजे ताब्यात घेण्याचे आदेश कोतवाली व तोफखाना पोलिसांंना दिले होते. मात्र डिजेमालकांनी डिजे थेट एका लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात घातलेे. पोलिसांनी धिटाई सुरू केली असता कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन हाय-हाय….. अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांनी लोकप्रतिनिधीच्या गेटमध्ये प्रवेश करण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादा ओलांडूनही तीन डिजे पोलिसांच्या ताब्यातून सहीसलामत सुटले. 

LEAVE A REPLY

*