डीआरएस पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

0
ऑकलंड । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या टी-20 सामन्यात तिसर्‍या पंचांनीच चुकीचा निर्णय दिल्याने डीआरएस पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

दुसर्‍या सामन्यात आपल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कृणाल पंड्याने डॅरेल मिचेलला पायचित केलेे. यावेळी मैदानावरील पंचांनी मिचेलला बाद दिले. भारतीय संघाने जल्लोष केला. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने पंचांकडे रिव्ह्यू मागितला. कारण हा चेंडू बॅटला लागल्याचे मिचेलने केनला सांगितले होते. तिसर्‍या पंचाकडे विचारणा करण्यात आली आणि त्यांनी या गोष्टीचा रिव्ह्यू करायला सुरुवात केली.

तिसर्‍या पंचांनी चेंडू नेमका कुठे पडला, पॅडवर कुठे लागला आणि तो यष्टीवर जातोय का, हे पाहिले. त्यानंतर तिसर्‍या पंचांनीही मिचेलला बाद ठरवले. त्यावेळी केन मैदानावरील पंचांना सांगत होता की, हा चेंडू मिचेलच्या बॅटला लागला आहे. त्यामुळे तो बाद ठरत नाही, असे सांगितले. हॉटस्पॉटमध्ये चेंडू बॅटला लागल्याचा पांढरा ठिपका पुसटसा दिसतही होता. त्यावेळी केन पंचांची वाद घालत होता. पंच ऐकत नाहीत, हे पाहिल्यावर त्याने आपला मोर्चा रोहितकडे वळवला आणि मिचेल बाद नसल्याने खिलाडूवृत्ती दाखवून त्याला खेळू द्यावे, असे केन म्हणत होता. त्यावेळी रोहितला नेमके काय करावे ते कळत नव्हते. मिचेलला बाद ठरवायचे की खेळायला द्यायचे, हा विचार रोहित करत होता.

मिचेल नाबाद आहे, त्याला खेळायला द्या, असे केन रोहितला सांगत होता. रोहितला काय करावे हे कळत नसताना, धोनी त्याच्यासाठी धावून आला. धोनी फक्त एकच वाक्य बोलला आणि सारा पेच सुटला. धोनी म्हणाला, पंचांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. पंचांनी मिचेलला बाद ठरवले होते. त्यामुळे मिचेलला तंबूत परतण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पण, या प्रकरणावरून डीआरएस मात्र पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. यातील बॉल ट्रॅकिंग पद्धत ही फुलप्रूफ नाही, असा मतप्रवाह वाढत चालला असताना आता हॉटस्पॉटवरही प्रश्नचिन्ह उठू लागले आहे.

LEAVE A REPLY

*