Type to search

नंदुरबार

डासजन्य रोगांवर प्रभावी ठरणारे ‘गप्पी मासे’ दुर्लक्षितच

Share

योगिराज ईशी
कळबू, ता.शहादा । मनुष्याला होणार्‍या विविध रोगांमध्ये सर्वाधिक रोग डासांमुळे होतात. सध्या सर्वत्र शहरीसह ग्रामीण भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दवाखाने, रुग्णालयात रुग्णांची गर्दी आहे. अनेकांचा मृत्यूही डेंग्युमुळे होत आहेत. परंतू, अगदी मोफत उपलब्ध असणारे आणि डासजन्य रोगांवर प्रभावी उपाय असलेले ‘गप्पी मासे’ मात्र जनजागृतीअभावी दुर्लक्षीतच असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यु आदी डासजन्य रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा हिवताप विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयातर्फ़े औषध पुरवठा, अबेट फ़वारणी आदी उपाय केले जातात. हे उपाय, रोग फ़ोफ़ावल्या आधी किंवा नंतर राबविणारे हे प्रतिबंधक उपाय आहेत. मात्र, या रोगांचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी प्रभावी असलेल्या गप्पी माशांकडे नागरिकांसह आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष आहेच, पण शासनाचेही जनजागृतीसाठी होणारे प्रयत्न नगण्य आहेत.

डासजन्य रोगांच्या निर्बंधासाठी डासांचे मुळ उगमस्थान असलेल्या, नाले, तलाव, घाण-कचरा गटारी, पाणी साचलेल्या जागा अशा ठिकाणी अबेटची फ़वारणी केली जाते. मात्र, डेंग्यु या रोगाचे उगमस्थान स्वच्छ पाणीच असल्याने येथे या उपायांचा वापर करता येत नाही. अशावेळी घरातील व गच्चीवरील पाण्याच्या टाक्या, ड्रम, हौद अशा ठिकाणी गप्पी माशांचा वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जाते. परंतु, हे आवाहन सिमीत प्रमाणात असल्याने जनसामान्यांमधे गप्पी मासे अद्याप दुर्लक्षितच दिसत आहेत. हे मासे कुठुन घ्यायचे याचीच माहिती नसल्याने जिल्ह्यात जनतेकडुन यास प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांनी येथून गप्पी मासे नेऊन हौद, टाक्यांमधे टाकणे अपेक्षित आहे. मात्र, व्यापक जनजागृतीअभावी मासे नेमके घ्यायचे कुठून याचीच माहिती ग्रामस्थांना नसल्याने डेंग्युचा प्रसार अधिक होण्याची भिती बळावली आहे. सध्या हिवताप विभागाकडुन स्थिर पाणी असलेले शेततळे, नाले अशा ठिकाणी गप्पी मासे अल्प प्रमाणात सोडले जातात. परंतु, घरातील स्थिर पाण्यामधे याचा वापर होत नसल्याने डेंग्युच्या डासांना अंडी घालण्यासाठी आयते स्थळ उपलब्ध होऊ शकते. या अंडींमधून काहीदिवसातच लारवा (अळ्या) निघतात, आणि त्याचे रूपांतर भयंकर डेंग्यूच्या डासांमध्ये होते. शहरी भागात डेंग्युने थैमान घातले असले तरी ग्रामीण भागातही डेंग्युचे बहुतेक रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थामधे भितीचे वातावरण आहे. भविष्यातही याचा प्रादुर्भाव होणार नाही याची शाश्वती नसल्याने गप्पी माशांबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

शासनाकडून अगदी मोफ़त उपलब्ध असलेले हे मासे डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया अशा डासजन्य गंभीर रोगांवर प्रभावी उपाय ठरतात. रोग झाल्यावर उपचार करण्याची वेळच येऊ नये यापेक्षा गप्पी माशांचा वापर केल्यास डासांची उत्पत्तीच होणार नसल्याने या अत्यंत प्रभावी उपायाचा वापर करण्याची गरज आहे. सध्या पावसामुळे, गावातील गटारी, नाले, घराशेजारिल डबके याच्यामधे पाणी जैसे थे आहे.त्यामुळे डांस उत्पत्ती होण्यास आधिक मदत होते. डासजन्य रोगांसाठी पोषक वातावरण आहे. अशावेळी आरोग्य विभाग व सबंधीत गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी म्हणून जबाबदारी घेऊन फवारणी करुन गावात एक दिवस कोरडा पाडण्याचे आवाहन करुन उपाय योजना करण्याची मागणी सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण भागात डेंग्युचा प्रादुर्भाव
शहरी भागांमधे सध्या डेंग्युने थैमान घातले असले तरी ग्रामीण भागातही डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ग्रामस्थांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क राहून, डासनिर्मुलनासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजेत. ग्रामस्थांनी गप्पी माशांचाही वापर करावा. तसेच घरा सभोवताली स्वच्छता राखावी याशिवाय सर्वांनी आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा. ग्रामपंचायतींनाही आवश्यक सुचना देऊन उपाययोजना करुण सहकार्य करण्याची गरज आहे.

गप्पी मासे
गप्पी मासा हा लहान कीटक अन्न म्हणून खात राहातो. रॉबर्ट जॉन लेशमीर गप्पी या ब्रिटिश शास्त्रज्ञाला तो 1766 मध्ये त्रिनिदाद बेटावर सापडला. या माशांचे लहान कीटक खात राहणे आणि त्यांच्या प्रजननाचा जलद वेग पाहून हे मासे रोगनिवारणासाठी उपयुक्त ठरतील हे गप्पी या शास्त्रज्ञाच्या लक्षात आले. या माशांना त्यांच्या संशोधकावरून गिरार्डिनस गप्पी हे नाव पडले. पण कालांतराने गिरार्डिनस गळून पडले आणि गप्पी रुळले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!