गोदावरी कालव्यांच्या फुटतुटीनंतर डाव्याला पाणी सोडले, उजव्याला आज सोडणार

0

अस्तगाव (वार्ताहर)- उन्हाळी आवर्तनसाठी सोडलेले पाणी काही अंतरावर जाते न जाते तोच गोदावरीचे दोन्ही कालवे फुटल्यानंतर दोन्ही कालव्यांची डागडूजी करण्याची मोहिम जलसंपदाने युद्धपातळीवर राबविली. कोपरगावच्या दिशेने वाहाणारा डावा कालवा मंगळवारी रात्री 8 वाजता पुन्हा सोडण्यात आला. तर उजव्या कालव्यावरील मोरीचे ढापे तुटल्याने त्यावर स्लॅब टाकण्याचे काम बुधवारी रात्री 10 पर्यंत चालले. आज गुरुवारी उजव्याचेही आवर्तन सुरळीत सुरु होईल, अशी माहिती जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी दिली.

गोदावरीचे सिंचन तसेच बिगरसिंचनाचे आवर्तन सोमवारी रात्री 9 वाजता सोडले. डावा कालव्याचे पाणी नांदुरमधमेश्‍वर गावात बंधार्‍यापासुन चार किमी अंतरावर पोहचते न पोहचते तोच दोन तासात 11 वाजता नविन बांधकाम होत असलेल्या ठिकाणी कालव्याला घळ पडून तो फुटला. त्यामुळे या कालव्याच्या मुखापाशी पाणी बंद करण्यात आले. तर मंगळवारी 11 च्या दरम्यान गोदावरीचा उजवा कालवा 20 किमी च्या जवळ सिन्नर तालुक्यातील दहिवडी शिवारात मोरीचा ढापा तुटल्याने तो ही फुटला.
त्यामुळे त्याचेही पाणी बंद करण्यात आले.
डावा कालव्याचे काम खुप अडचणीचे नसल्याने त्याचे काम काही वेळेत आटोपल्यानंतर बंद केल्याच्या 22 तासानंतर हा कालवा मंगळवारी रात्री आठ वाजता सुरुवातीला 125 क्युसेक ने नंतर दोन तासांनी 10 वाजता 150 ने तर बुधवारी दुपारी 12 वाजता 250 क्युसेक ने सोडण्यात आला. त्यामुळे डाव्याचे आवर्तन सुरळीत सुरु झाले आहे. कोपरगाव विभागाचे उपअभियंता भास्कर सुरळे, एस. के. मिसाळ यांनी यंत्रणा उभी करत काम आटोपले.
दरम्यान राहाता तालुक्याच्या दिेशने वाहाणार्‍या उजव्या कालवा बंद केल्यानंतर बुधवारी 12 वाजता आट आल्याने त्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले. या कालव्याच्या मोरीचे कल्व्हर्ट (ढापा) तुटल्याने त्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले. हे काम रात्री 10 वाजेपर्यंत चालले. नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. शिंदे, राहाता उपविभागाचे उपअभियंता संजय कासनगुट्टुवार, कालवा निरीक्षक बी. व्ही. मेहेत्रे, डी. बी. बागुल, सी. एम. आव्हाड, श्री. गोर्डे, श्री. वाणी, हे कालव्याच्या दुुरुस्तीच्या ठिकाणी ठाण मांडून हेाते. नविन टाकलेला स्लॅब किमान 12 तास पक्का व्हावा या दृष्टीने आज गुरुवारी उजव्याला नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातुन पाणी सोडले जाणार असल्याने हा कालवा ही वाहता होणार आहे. पाणी सोडल्यानंतर 72 तासांनी हे पाणी तालुक्यात पोहचणार आहे. दोन दिवस आवर्तन उशीराने सुरु होणार आहे.
दोन्ही कालवे फुटल्याने दारणा तसेच मुकणे धरणातील विसर्ग ही बंद करण्यात आला होता. दारणाचा 1100 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग मंगळवारी दुपारी 3 वाजता बंद करण्यात आला. तर मुकणेचा विसर्ग ही याच दिवशी सायंकाळी 6 वाजता बंद करण्यात आला. नांदुमधमेश्‍वर बंधार्‍यात 163 दशलक्षघनफुट पाणी असल्याने डाव्याला अडचण नाही. मात्र उजवा सुरळीत सुरु झाल्यानंतर या दोन्ही धरणांच्यामधुन पुन्हा पाणी सोडण्यात येणार आहे. आज गुरुवारी गोदावरीचा उजवा कालवा सुरु होणार असल्याने दोन्ही धरणांचा विसर्गही सुरु होईल.

LEAVE A REPLY

*