Type to search

ब्लॉग

डार्क वेबचा धोका

Share

डार्क वेब हे वेबसाईटचे असे एक मायाजाल आहे की जिथे खूप सार्‍या वेबसाईट या सांकेतिक स्वरुपामध्ये बनवलेल्या असतात.  या वेबसाईट उघडण्यासाठी वापरकर्ता हा संगणकामध्ये तरबेज असणे महत्त्वाचे आहे. डार्क वेबचा वापर हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त होत असला तरी काही लोक अपरिहार्य कारणांमुळे पण त्याचा वापर करतात.

डार्क वेब ब्राऊजर डाऊनलोड करणे बेकायदेशीर नसले तरी पण जे लोक डाऊनलोड करतात ते पोलीस आणि तत्सम संस्थांच्या रडारखाली येतात. कारण बहुतेक गुन्ह्यांची सुरुवात इथून होताना दिसते. डार्क वेबवरील वापरकर्त्याचा आयपी म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस सातत्याने बदलत राहतो. त्यामुळेच वापरकर्त्याचा शोध घेणे कठीण असते म्हणण्यापेक्षा त्यांचा माग काढणे जवळपास अशक्य असते. डार्क वेबच्या वेबसाईटचा शेवट डॉट कॉम किंवा डॉट इनऐवजी डॉट ओनियन असा असतो. यामध्ये संकेतस्थळ होस्ट करणार्‍याबरोबर सर्च करणारा वापरकर्ताही अज्ञात असतो.

त्यामुळेच या संकेतस्थळांवरील आर्थिक देवाणघेवाण ही बीटकॉईनसारख्या तत्सम व्हर्च्युअल चलनामध्ये होते. त्यामुळे या व्यवहारांवर नजर ठेवता येत नाही. डार्क वेबच्या अंधार्‍या जगात व्यापार करणारे लोक त्याचा फायदा उठवतात.

डार्क वेबपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यापासून दूर राहणे. एखादा सामान्य वापरकर्ता जर चुकून डार्क वेबच्या दुनियेत गेला तर त्याची अवस्था म्हणजे डोळे बांधून भर रस्त्यात उभे राहिलेल्या व्यक्तीसारखी आहे. दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने गाडी येऊन त्याला धडक देऊ शकते. डार्क वेबच्या जगात सतत हॅकर फिरतच असतात, ज्यांना नवीन बकरे शिकारीसाठी हवेच असतात. चुकीच्या टॅबवर क्लिक करण्याचा अवकाश, आपल्या बँक खात्याचे डिटेल्स, सोशल मीडियासह खासगी फोटो आणि व्हिडिओदेखील त्यांच्या हाती आपोआप जातात.

डार्क वेबमधील गुन्हेगारांपर्यंत तपास अधिकार्‍यांना पोहोचणे मुश्किल असले तरी त्या दुनियेतील कुणा व्यक्तीने त्यांची मदत केली तरच तिथपर्यंत पोहोचणे शक्य असते. या पार्श्वभूमीवर इंटरनेटचा वापर करताना सुरक्षितता जपणे आवश्यक असते. विशेषतः सातत्याने ऑनलाईन राहणार्‍या, देवाणघेवाण, शॉपिंग करणार्‍यांनी याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे. कारण अनावधनाने जरी एखाद्या अनोळखी टॅबवर क्लिक झाले तर अजाणतेपणी डार्क वेबच्या जाळ्यात अडकून आपल्याकडील सर्व गोष्टी गमावण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. ते टाळण्यासाठी इंटरनेटचा वापर करताना योग्य आणि सुरक्षित संकेतस्थळांचा वापर करणेही

महत्त्वाचे आहे. आपल्याला जराही  असुरक्षिततता वाटली किंवा आयडेंटिटी थेफ्टची शंका येत असेल तर आपला पासवर्ड बदलत राहावा.

डार्क वेबमुळे 13 लाख भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती किंवा डेटा धोक्यात आहे. यानिमित्ताने डार्क वेब म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे.

– मिलिंद सोलापूरकर

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!