ट्रस्टीला भक्तांनी कोंडून मारले

0

सावेडीतील दत्त देवस्थानचा वाद , दरोड्याचा गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी परिसरातील दत्त देवस्थानमधील ट्रस्टी-भक्तांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईच्या काही भक्तांनी पुण्याचे रहिवासी असलेल्या देवस्थानच्या दोघा ट्रस्टींना खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. दोघा ट्रस्टीकडील सोन्याची चेन व 19 हजार रुपयांची रोकड या मारहाणीत गहाळ झाली आहे. तोफखाना पोलिसांनी मारहाण करणार्‍या भक्त असलेल्या 15 जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नितीन श्रीनिवास जोगळेकर व राजन जोशी (रा. सदाशिवपेठ, पुणे) अशी मारहाण झालेल्या दोघा ट्रस्टींची नावे आहेत. हे दोघे रविवारी (दि.9) अकरा वाजेच्या सुमारास गुरूपौर्णिमेनिमित्त नगरला आले होते. तेथे देवस्थानचे काही भक्त आगोदरच उपस्थित होते. ट्रस्टच्या पदावरुन मुंबई व पुणे या दोन गटात वादावादी झाली. दोन्ही गटाला नगरच्या भाविकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गट कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुंबईच्या भक्तांनी पुण्याच्या जोशी व जोगळेकर यांच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असता त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. दोघांना मारहाण करून यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व खिशातील रोकड असा 19 हजार रूपयांचा मुद्देमाल गायब करण्यात आला. या प्रकरणी जोगळेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुंबईतील अज्ञात 15 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास काळे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*