Type to search

क्रीडा

टीम इंडियाला आघाडी घेण्याची मोठी संधी

Share

अँटिग्वा | ईशांत शर्माचा भेदक मारा आणि त्याला महंमद शमी, रवींद्र जडेजाची मिळालेली साथ या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २२२ धावांत रोखण्यात यश मिळवले. यानंतर भारताने दुसर्‍या डावात ३७ षटकांत ३ बाद ९८ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे १७३ धावांची आघाडी झाली होती. दुसर्‍या डावात भारताचे लोकेश राहुल (३८), मयांक अगरवाल (१६) यांना चेसने बाद केले, तर रोचने पुजाराचा (२५) त्रिफळा उडवला. अजिंक्य रहाणे व विराट मैदानात होते.

भारताने पहिल्या डावात २९७ धावा केल्या होत्या. यानंतर विंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने आक्रमक सुरुवात केली. मात्र, आठव्या षटकात महंमद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. कॅम्पबेल आणि कार्लोस ब्रेथवेटने ३६ धावांची सलामी दिली. यानंतर ब्रेथवेट आणि एस. ब्रूक्स यांनी संयमी फलंदाजी केली; परंतु ईशांत शर्माने स्वत:च्या गोलंदाजीवर ब्रेथवेटचा अप्रतिम झेल टिपून ही जोडी फोडली. पाठोपाठ ब्रूक्सही रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. डॅरेन ब्राव्हो आणि रोस्टन चेस यांनी काही काळ भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला खरा; मात्र या जोडीलाही मोठी भागीदारी रचता आली नाही. बुमराहने ब्राव्होला पायचीत टिपले. यानंतर चेसने शाय होपला साथीला घेत विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

या जोडीने ४२ धावांची भागीदारी केली. चेस चुकीचा फटका मारून बाद झाला. ईशांतने त्याला माघारी पाठविले. चेसने ७४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारसह ४८ धावा केल्या. विंडीजचा निम्मा संघ १३० धावांत माघारी परतला होता. यानंतर होप आणि हेटमायर यांनी डाव सावरून विंडीजला १७४ धावांपर्यंत पोहोचविले. ही जोडी जमली असे वाटत असतानाच ईशांतने एकापाठोपाठ शाय होप, शिमरॉन हेटमायर आणि केमार रोचला बाद केले. हेटमायर आणि रोच एकाच षटकात माघारी परतले. त्यामुळे विंडीजची ५ बाद १७४ वरून ८ बाद १७९ अशी स्थिती झाली. दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विंडीजने पहिल्या डावात ८ बाद १८९ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजचा संघ अद्याप १०८ धावांनी पिछाडीवर होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!