टंचाई आढावा बैठकीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार

0

बैठकीचा फार्स : कोळगे; विरोधकांकडून खोटेनाटे आरोप : आ. राजळे

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तहसील कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत विविध गावांचे प्रश्न व उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न सोडवले जात नाहीत अशा आरोपाची झणझणीत फोडणी सत्ताधार्‍यांना देत निषेध व्यक्त करत बैठकीवर बहिष्कार टाकला. तर या बैठकीच्या अध्यक्षा आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना विकासाचे देणे-घेणे नाही ते राजकारण करत असल्याचे सांगितले. यामुळे बैठक चांगलीच गाजली.
येथील तहसील कार्यालयात आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी शाम गोडभोरले, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, भाजपा तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले व तालुक्यातील विविध कार्यालय प्रमुख, ग्रामसेवक, तलाठी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
बैठकीमध्ये गदेवाडीला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेच्या मुख्य जलवाहिनेतून काही लोक शेतीसाठी पाणी घेत असल्याची तक्रार करण्यात आली. यावर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे सांगण्यात आले. मुंगी येथील पाणी योजनेवर बराच वेळ चर्चा झाली. खामपिंप्री येथील रोहित्र 15 दिवसापासून नादुरुस्त असल्याचे व रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे चालू असल्याची वस्तुस्थिती तेथील मांडली.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या उपस्थित कनिष्ठ अधिकार्‍यांनी रस्त्यावरील मुरुम काढूऩ घेऊ असे बैठकीत सांगितले.
शेवगाव शहरातील स्वच्छता, वीज, पाणी या प्रश्नांवर चर्चा झाली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुधा कुरणावळ यांनी सुधारणा करण्याचे मान्य केले.
गावानुसार ही चर्चा पुढे जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 कार्यकर्ते सभागृहात येऊन बसले. त्यांनी निषेध व्यक्त करत संजय कोळगे यांच्यासह जि. प. सदस्य रामभाऊ साळवे, ताहेर पटेल, भागवत लव्हाट, राजेंद्र देशमुख, राजेंद्र वाणी, संजय वडते, नगरसेवक उबेद शेख, विकास फलके, शंकरराव नारळकर, अशोक दुकळे, अमोल वडणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले.

 उन्हाळा संपत आल्याने या बैठकीचे आयोजन हा एक भास वाटत आहे. अंदमानात मान्सून येऊन पोहचला आहे. आपल्याकडे काही ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काही जि. प. सदस्यांना बैठकीचे आमंत्रण दिलेले नाही. तसेच डीवाय 2 या चारीद्वारे वडुले, वाघोली, आव्हाणे, अमरापूर, सामनगाव आदी गावातील शेतीसाठी पाणी सोडण्यात न आल्याने पिके जळून गेली. शेतकर्‍यांच्या हातात आलेला घास गेला. पाथर्डीचे भरणे होतात व शेवगावचे होत नाहीत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही? असे प्रश्न युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी उपस्थित केले.

 विरोधकांनी खोटेनाटे आरोप केले. तालुक्यातील शेतीसाठी नियोजन करुन चार वेळा पाटाला पाणी सोडण्यात आले. सामनगाव पर्यंत पाणी पोचले. तालुक्याचा कळवळा असता तर पंचायत समितीचे सभापती व सदस्य बैठकीला उपस्थित राहिले असते. विरोधकांकडे लक्ष देऊ नका. आपण आपल्या प्रश्नांकडे वळू असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा बैठकीत गावानुसार आढावा घेण्यास सुरुवात केली.

अनुपस्थित अधिकार्‍यांवर कारवाई होणार का?
या बैठकीस काही विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्याचे चर्चेतून आमदार राजळे यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी तहसीलदारांना अनुपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना नोटीस काढण्याची सूचना दिली. या बैठकीस काही नव्हे तर अनेक विभागांचे प्रमुख उपस्थित दिसत नव्हते. आता या सर्वांना नाटिसा दिल्या जातात का? याकडे उपस्थित अधिकारी व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

*