टंचाईकृती आराखड्यातील 64 कोटींच्या निधीची बचत

0

यंदा टंचाईवर आतापर्यंत अवघा 14 कोटींचा खर्च

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने दिलेली साथ आणि जलसंधारणाच्या जोरावर गेल्या काही वर्षात यंदा उन्हाळ्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरकारचे टंचाई उपायोजनांवर खर्च होणार्‍या निधीत घट झाली आहे.

तब्बल 64 कोटी रुपयांची यंदा बचत झाली आहे. जूनपर्यंत जिल्ह्याच्या टंचाईकृती आराखड्यावर अवघा 14 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून नगरकरांची टंचाईमुळे वाईट अवस्था झाली होती. एकावर्षी तर सरकारी पाण्याच्या टँकरने 750 टप्पा ओलांडला होता. मात्र, गतवर्षी सरासरी ऐवढा पाऊस झाला. यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा, भंडारदरा, निळवंडे, घोड, या धरणांत समाधानकारक पाणीसाठा आणि जलयुक्त शिवारसह अन्य जलसंधारणाच्या कामाचा चांगला सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग नोव्हेंबर महिन्यात पुढील सहा महिन्यांत जिल्ह्यात निर्माण होणारा टंचाईकृती आराखडा तयार करून ठेवत असते. यासाठी जून ते ऑक्टोबर महिन्यांत झालेला पाऊस, धरणातील पााणीसाठा, वरिष्ठ भू वैज्ञानिक यांनी जिल्ह्यातील विहिरींव्दारे भू गर्भातील पाणी पातळीचे केलेले निरीक्षण यांच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात येत असतो.

आराखड्यात टंचाईच्या काळात कोणत्या तालुक्यात किती पाण्याच्या टँकरची गरज भासू शकते. किती ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नळ पाणी योजना आश्यक आहे. नव्याने विंधन विहिरी कोठे घेणे आवश्यक आहेत. यासह अन्य उपाययोजना या आराखड्यात सूचवण्यात आलेल्या असतात. जिल्हाधिकारी या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर त्यावर टंचाईच्या सहा महिन्यांच्या कालावधीत काम करण्यात येते.

गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने टंचाईच्या कालावधीत 78 कोटी रुपये विविध उपाययोजनांवर खर्च केले होते. यंदा परिस्थिती समाधानकारक असल्याने जूनपर्यंत होणारा खर्च हा 14 कोटी 14 लाख रुपये होणार आहे. यामुळे यंदा टंचाईकृती आरखड्यातील 64 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

असा आहे आराखडा
टंचाईग्रस्त गावे 659, टंचाईग्रस्त वाड्या 1 हजार 543, उपाययोजना 1 हजार 206 आणि खर्च 14 कोटी 14 लाख रुपये

अशा केल्या उपाययोजना
223 गावे आणि 146 वाड्यांसाठी 394 ठिकाणी खासगी विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. यात 17 ठिकाणी सरकारी पाण्याचे टँकर भरण्यासाठी उद्भव तयार करण्यात आले. सध्या 48 गावे आणि 200 वाड्यांवर 59 टँकरव्दारे 1 लाख 10 हजार जनतेची तहान भागवण्यात येत आहे.


34 गावे आणि 36 वाड्यांवर 44 पाणी योजनांचे काम तातडीने पूर्ण करून घेण्यात आले आहे. 33 गावे आणि 8 वाड्यावस्त्यांवर नळ पाणी योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*