Type to search

ब्लॉग

झोपी गेलेला…!

Share

थोड्या काळात जास्त पाऊस झाला हे खरे असले तरी सरकारच्याही अनास्थेचे आणि समन्वयाचे पितळही उघडे पडले. त्यामुळे नुकसानीत भरच पडली. सरकार याबाबतीत जनतेला विश्वासात घेईल का?

गेलेला जागा झाला…अशी मराठीत प्रचलित म्हण आहे. त्याचे प्रत्यंतर सध्या येत आहे. राज्यातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती भीषण आहे. या अभूतपूर्व स्थितीची जबाबदारी शासनाची आहेच. या स्थितीत सरकारवर टीका करणे योग्य नाहीच. मात्र पूरनियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय साधण्यास झालेला विलंब हेच या पूरामागील महत्त्वाचे कारण आहे. किमान 48 तास उशिराने जागे झालेल्या शासनाला जाग आली तोवर उशीर झाला होता, मग नंतर धावपळ केली गेली. अधिकार्‍यांची हजेरी घेण्याचा प्रकार झाला, त्यालासुद्धा काय अर्थ राहिला? परिस्थिती भीषण झाल्यानंतर दोन दिवसांनी रात्री उशीरा अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्यूसेक करण्यात आला, तोवर इकडे जनतेचे किडूक मिडून वाहून गेले होते. हाल झाले होते. मुख्यमंत्र्याच्या पूरग्रस्त भागातील दौर्‍यानंतरच मदत कार्याला वेग आला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामाला त्यानंतर सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युद्धपातळीवर केली जाईल, अशी घोषणा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या वेगवान बचाव कार्यात हजारो लोकांना आणि जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. 267 तात्पुरत्या मदत छावण्या उभारण्यात आल्या. सुमारे 43 पेक्षा जास्त मदत पथके तैनात करण्यात आली. एनडी आरएफच्या तीन जादा तुकड्या गुजरातमधून अन्य राज्यांतून तसेच राज्याच्या अन्य भागातून मागविण्यात आल्या. भारतीय नौदलाच्या सात तुकड्या मदत कार्यात सहभागी झाल्या. कोल्हापुरात 125 बोटी तैनात होत्या. अशी माहिती मग मुख्यमंत्र्यानीच पत्रकारांना दिली. पण आभाळच फाटल्यावर हे सारे प्रयत्न खुजे होते.

सांगलीत 16 जणांना जलसमाधी मिळाली, तिकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. खराब हवामानामुळे तेथे पोहोचता येत नाही, असे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना तेथे रवाना केल्याचे त्यांनी सांगून टाकले.

पण ज्यावेळी सरकार मुंबईत 370चा जल्लोष साजरा करत होते, त्यावेळी अलमट्टीत संकट राज्याच्या दरवाज्यात उभे होते. दोन्ही राज्यांतील जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळीच समन्वय साधून पाण्याची पातळी धोकादायक होणार नाही, याची काळजी घेतली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. पण सरकारला जाग आली तोवर उशीर झाला होता, हे वास्तव आहे. त्यामुळे मग मुंबईत आल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकार्‍यांना झापाझापी करून त्यांनी वेळीच काळजी का घेतली नाही म्हणून त्यांची हजेरी घेण्यात आली, अशी माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. तिकडे मिरजेत त्यावेळी शेकडो जनावरांनाही जलसमाधी मिळाली होती, पूरग्रस्तांवर चोरट्यांचा डल्ला झाल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीचे तीन तेरा वाजल्याचेही समोर आले आहे, सांगलीत लष्कराला पाचारण करण्यात 24 तास उशीर झाल्याचे स्थानिक अधिकारीदेखील खासगीत मान्य करतात. लष्कर दाखल झाले तरी अलमट्टीच्या पाण्याचा निचरा झाल्याशिवाय मदत अभियान वेगाने होणे शक्य नव्हते. खुद्द जिल्हाधिकार्‍यांचाही बंगला पाण्यात होता.

पाण्याची पातळी दोन- तीन दिवसांपासून वाढली आणि नंतर निचरा होण्याऐवजी स्थिर होती. बचावकार्य त्यामुळे अजूनही सुरूच होते, नागरिकांचे दिवसभरात तिसर्‍यांदा स्थलांतर करण्याची वेळ काही भागात त्यामुळे आली होती. पुरामुळे 233 गावे बाधित झाली असून 18 गावांना पूर्णपणे पुराचा वेढा पडला आहे. जिल्ह्यात पुरामुळे 20933 बाधित कुटुंबे असून 97102 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी 152 संक्रमण शिबिरे असून यामध्ये 38142 लोकांची सोय केली आहे. पूरग्रस्तांच्या बचाव व मदत कार्यासाठी 60 बोटी असून 425 जवान कार्यरत आहेत. जिल्ह्यातील 3813 घरांची पुरामुळे पडझड झाली असून 79 घरे पूर्णत: पडली असून 3651 घरे अंशत: पडली आहेत तर 83 जनावरांची गोठे पडली आहेत. जिल्ह्यात पुरामुळे 107 बंधारे पाण्याखाली गेले असून एनएच 4 या राष्ट्रीय महामार्गासह 158 रस्ते पुरामुळे बंद आहेत. 390 पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून महावितरणचे 13 उपकेंद्रे व 127 गावठाण व शहरी वाहिन्या बंद पडल्या आहेत. एकूण 201032 वीज ग्राहकांची कनेक्शन बंद असून 67984 हेक्टरवरील कृषी पिकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. पाऊस अनपेक्षित कोसळधार आलाच, पण सरकारच्याही कामांचे, असमन्वयाचे पितळ उघडे पडलेच.
– किशोर आपटे, 9869397255

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!