झेडपीकडे मनपाची 53 कोटी थकबाकी

0

12 ग्रामपंचायतींकडील पाणीपट्टी थकली

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींच्या थकीत पाणीपट्टीपोटी अहमदनगर महापालिकेने जिल्हा परिषदेकडे 52 कोटी 79 लाख रुपयांची मागणी केली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, नगर गटविकास अधिकारी आणि पाथर्डीच्या गटविकास अधिकारी यांना थकबाकीसंदर्भात पत्र दिले असून तातडीने ही थकबाकी भरण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या पाण्याच्या उद्भवातून संबंधित ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. सदर पाण्याची पट्टी थकीत असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. मात्र, पालिकेकडून जिल्हा परिषदेला पाठवण्यात आलेल्या थकीत पाणीपट्टीचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. यात सदरची पाणीपट्टी कधीपासून थकबाकीत आहे. कोणत्या उद्भवावरून संबंधित ग्रामपंचायतीला किती पाणीपुरवठा झाला याचा कोणताच तपशील जिल्हा परिषदेला देण्यात आलेला नाही.
या प्रश्‍नावर काही दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर महापालिकेच्या अधिकार्‍यांची आणि जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी देखील या थकबाकीचा सविस्तर तपशील जिल्हा परिषदेला देण्यात आला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. महापालिकेने ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला त्यांना पाणीपट्टी संबंधित ग्रामपंचायतींने देणे बंधनकारक आहे. मात्र, हे करत असताना त्याचा तपशील महापालिकेने देणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित ग्रामपंचायतीने महापालिकेची पाणीपट्टी वेळोवेळी भरलेली आहे. काही वेळा सरकारकडून ग्रामपंचायतींना अनुदान देण्यास वेळ लागलेला आहे. या काळातील दंड आणि व्याज महापालिकेने ग्रामपंचायतींना आकारले असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेचा आहे. यामुळे पाणीपट्टीचा आकडा फुगला आहे. यासह एक शासकीय यंत्रणा दुसर्‍या शासकीय यंत्रणेला दंड आणि व्याज कसे आकारू शकते ?असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी संपर्क केला असता, या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन भाष्य करणे योग्य राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महापालिकने 52 कोटी 79 लाख रुपयांच्या थकीत पाणीपट्टीचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. मात्र, त्याचा तपशिल जिल्हा परिषदेला देण्यात आलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेने पुन्हा मनपाला पत्र दिले असून यात थकबाकीचा सविस्तर तपशील मागवला आहे. त्यानंतर दोन्ही यंत्रणांची बैठक होईल, त्यातून मार्ग निघेल.
– सुवेंद्रकुमार कदम,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, अहमदनगर.

अशी आहे थकबाकी
वरवंडी व इतर 5 गावे (ता. राहुरी) 25 कोटी 2 लाख, देहरे (ता.नगर) 1 कोटी 74 लाख, शिंगवेनाईक (ता. नगर) 29 लाख 34 हजार, विळद गवळीवाडा (ता.नगर) 41 लाख 54 हजार, खारेकर्जुने (ता.नगर) 2 कोटी 62 लाख, हिंगणगाव (ता. नगर) 2 कोटी 97, शेंडी पोखर्डी (ता. नगर) 1 कोटी 25 लाख, नागरदेवळे (ता. नगर)26 हजार, बुर्‍हाणनगर (ता. नगर) 1 कोटी 11 लाख, बुरूडगाव (ता. नगर) 24 हजार, गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर 16 कोटी 38 लाख आणि गटविकास अधिकारी पाथर्डी 95 लाख 77 हजार असा आहे.

LEAVE A REPLY

*