झाडेझुडे जीव सोयरे पाषाण!

0
आपल्या संतांनी मानवासकट निसर्गातील संपूर्ण चराचरसृष्टीला एक कुटुंब मानले आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्यावर संतांनी तर्‍हेतर्‍हेचे भाष्य केले आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… झाडेझुडे जीव सोयरे पाषाण’ असे तुकोबारायांनी म्हटले आहे. शहरीकरणाच्या वेगात मानवाचे निसर्गावर अतिक्रमण सतत चालू आहे.
पर्यावरणाकडे दुर्लक्ष, प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, जल, वायू, ध्वनी यांचे प्रदूषण निसर्गासाठी तर हानिकारक आहेच; पण त्याचे मानवी जीवनावरदेखील विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना; पण आपणही निसर्गसाखळीचाच एक भाग आहोत, मानवी जीवनाला प्राणी जीवनाचा आधार अर्थपूर्ण बनवतो हे लक्षात येऊ लागले आहे. मानव आणि निसर्गसाखळीतील समतोल कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

निसर्ग सान्निध्यासाठी अनेक उपक्रम व मोहिमा आयोजित केल्या जात आहेत. निसर्गाच्या ओढीमुळेच कृषी पर्यटन, व्याघ्र पर्यटन, गिर्यारोहण आदी छंदांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून मर्यादित अर्थाने का होईना; पण अनेकांना रोजगारही मिळाला.

कृषी पर्यटनातून समस्यांवर मात करण्यासाठी बळीराजाला बळ मिळू लागले. शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली तेव्हा माणसाला हिमालय कवेत घेतल्याचा कोण आनंद झाला होता; पण आता पुणेकर किशोर धनकुडेने एकदा नेपाळच्या आणि दुसर्‍यांदा चीनच्या दिशेने एव्हरेस्टवर झेंडा रोवला आहे. दरवर्षी शेकडो गिर्यारोहक तेथे पोहोचत आहेत.

निसर्गाशी पुन्हा एकदा मैत्री प्रस्थापित करण्यासाठी अभिनव प्रयोग हाती घेतले जात आहेत. नाशिकच्या नेचर क्लबतर्फे गेल्या तीन वर्षांपासून ‘पक्ष्यांची शाळा’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला जात आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणा-पाण्याची सोय व जिज्ञासू विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख करून दिली जाते. नदीकाठावरील पक्ष्यांचे निरीक्षण करून पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी खास उपक्रम राबवला जातो.

यंदा संत गाडगे महाराज धर्मशाळेत हे वर्ग भरले आहेत. आतापर्यंत शाळेत ३० प्रजातीच्या शेकडो पक्ष्यांनी किलबिलाट सुरू केला आहे. शाळेसाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेवर साहित्य तयार केले जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र अनुकरण व्हावे असाच तो कौतुकास्पद प्रयोग आहे. असे नावीन्यपूर्ण उपक्रम हौसेने करणार्‍या सर्व संबंधितांचे अभिनंदन!

LEAVE A REPLY

*